एकनाथ महाराज या ठिकाणी बलरामदादांच्या तोंडून रुक्मिणीला उपदेश करण्याच्या निमित्ताने, तुम्हा आम्हा सर्वांनाच पारमार्थिक उपदेश करतात तो असा- मनुष्यमात्राला मोहाने ग्रासले आहे. कृष्णाचीच ही माया आहे जी ब्रह्मदेवालाही कळणे, आवरणे अवघड आहे. तिथे सर्वसामान्याची काय कथा? प्राणीमात्र मायेच्या अधीन हाऊन देहबुद्धी धरतो म्हणजेच स्वतः देहच आहे असे मानू लागतो. सुहृद, दुर्हृद, उदासीन असे मानणे ही देहबुद्धीच होय. त्रिगुणांच्या प्रभावानेच अशी भावना निर्माण होते. आपण देह हा नश्वर आहे हे जाणतो देहाचे चलन वलन संपल्यावर मृत्यू येतो हेही जाणतो. पण या देहाच्या संबंधाने काहीजणांवर अती प्रीति करतो तर काहींचा द्वेष करतो.
नाना अलंकारी कनक । तैसा सर्वाभूती आत्मा एक ।
हेचि नेणोनिया मूर्ख । एकासी अनेक म्हणताती ।।
अनेका घटीं जेवी अनेक । प्रतिबिंबोनि भासे अर्क ।
तैसा विश्वात्मा विश्वव्यापक । दिसे अनेक देहयोगे ।।
आकाश एकले एक निर्मळ ।मठी चौकोने घटी वर्तुळ।
विकारयोगे भासे प्रबळ । नव्हे केवळ निजवाच्य ।।
तैसा परमात्मा श्रीहरी । नाना आकारविकारी ।
एकानेकत्वाते धरी । देहसंचारी देहयोगे ।।
दागिने अनेक दिसत असले तरी ते एका सोन्याचेच बनले असतात. त्याचप्रमाणे सर्व भूतांच्या ठायी एकच आत्मा नांदत असतो. हे न जाणताच मूर्ख लोक एकालाच अनेक म्हणतात. सर्व देहांच्या ठायी ते एकच आत्मतत्त्व नांदत असते. पण आपण प्रत्येक देह वेगळा मानतो. प्रत्येक घटातील पाण्यात आकाशाचे वेगवेगळे प्रतिबिंब पाहून आपण आकाश वेगवेगळे आहे असे समजणे योग्य आहे काय? तसा विश्वात्मा विश्वव्यापक आहे पण तो प्रत्येक देहात वेगळा आहे असे आपल्याला वाटते. आकाश सर्वव्याप्त आहे पण ते घराच्या एका खोलीत चौकोनी तर घटात. मडक्मयात वर्तुळाकार. गोल आहे असे आपण विकारी विचाराने मानतो. तसाच हा परमात्मा श्रीहरी सर्वव्यापक आहे पण आपण त्याला आकार विकार चिकटवतो. देहबुद्धीने तो एकाचा अनेक आहे असे भासते.
येथे देहासीच जन्मनाश । आत्मा नित्य अनिवाश ।
घटभंगे घटाकाश । सहजस्थिती जेवी विरे ।।
देहाचे जन्मकरण । महाभूते गुणप्रमाण ।
अविद्येने केले जाण । जन्ममरण यालागी ।।
अविद्येने नवल केले । मिथ्या देह सत्यत्वे दाविले ।
तेचि अभिमाने घेतले । प्रेमे बांधिले देहबुद्धि ।।
जयासी देहाभिमान थोर । तयासी कल्पना अनिवार ।
तेणेचि दृढमूळ संसार । येरझार न खुंटे ।।
वास्तविक नाशिवंत देहालाच जन्म, मृत्यू आहेत. आत्मा हा सदैव नित्य अविनाशी आहे. घटाचा भंग झाला. मडके फुटले की घटाकाश म्हणजेच मडक्मयातील आकाश सर्व व्यापक आकाशात मिसळून जाते तसेच देह नाशा बरोबर आत्मा आपल्या व्यापक सहजस्थितीत विरुन जातो. वास्तविक तो सदोदित सर्वव्यापक असतो. पण आपण त्याला देहबुद्धीने वेगळा समजत असतो.
Ad. देवदत्त परुळेकर







