चीनच्या आक्रमक विस्तारवादाला भारताचा शह
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
लडाख संघर्षात चीनने घेतलेली हटवादी भूमिका आणि चीनच्या अन्याय्य विस्तारवादाला चपराक देण्यासाठी भारताने तैवानशी आर्थिक संबंध प्रस्थापित करण्याचा विचार चालविला आहे. यासाठी भारताला आपल्या परराष्ट्र धोरणात परिवर्तन करावे लागणार असून त्याची तयारी सुरू असल्याचे समजते.
तैवान हा चीनच्या पूर्वेला असणारा छोटा देश आहे. चीन या देशाला आपलाच भाग मानतो. तथापि, तैवान स्वतःला स्वतंत्र देश मानतो. तैवान हा चीनपासून वेगळा आणि स्वतंत्र देश आहे असे अमेरिकेसह अनेक पाश्चात्य देशसुद्धा मानतात. तथापि, भारताने तैवानला अशी मान्यता आजवर दिलेली नाही. चीनचा रोष पत्करावा लागेल, ही चिंता भारताला होती. त्यामुळे तैवानशी थेट आर्थिक संबंध प्रस्थापित करण्याची कृती भारताने इतके दिवस टाळली होती.
आक्रमकपणामुळे चीन एकाकी
चीनने कोणतेही कारण नसताना आणि भारताकडून कोणतीही प्रक्षोभक कृती झालेली नसताना लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषा बदलण्याचा व भारताच्या नियंत्रणातील प्रदेशात लष्करी घुसखोरी करण्याचा प्रयत्न गेल्या मे मध्ये केला. भारताने याचा जोरदार प्रतिकार करत चीनला रोखले. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये संघर्षाचे वातावरण आहे. चर्चेच्या अनेक फेऱया होऊनही चीन हटवादीपणा सोडावयास तयार नाही. त्यामुळे आता चीनच्या भावनांना भीक न घालण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. त्यामुळेच तैवानशी संबंध प्रस्थापित होणार आहेत.
यापूर्वीच प्रारंभ
तैवानला भारताचे दरवाजे उघडे करण्याची प्रक्रिया या महिन्याच्या प्रारंभीच सुरू करण्यात आली आहे. तैवानच्या फॉक्सकॉम टेक्नॉलॉजी ग्रुप, विस्ट्रॉन कॉर्पोरेशन आणि पेगाट्रॉन कॉर्पोरेशन या ती कंपन्यांना भारतात गुंतवणूक करण्याची अनुमती देण्यात आली. या कंपन्या भारतात स्मार्टफोन्सचे उत्पादन करणार आहेत. स्मार्टफोन्स क्षेत्रात 10.5 लाख कोटी रूपयांची गुंतवणूक करण्याची योजना आहे.
योजना मूकपणे साकारणार
तैवानशी संबंध प्रस्थापित करण्याच्या योजना फारसा गाजावाजा न करता मूकपण्s साकारली जाईल, अशी शक्यता आहे. केवळ या संबंधीची जुजबी माहिती माध्यमांना देण्यात आली आहे. सविस्तर योजना घोषित न होण्याची शक्यता आहे. मोदी सरकारने चीनकडून भारत करत असलेल्या आयातीचे प्रमाण शक्य तितके कमी करण्याच्या हालचाली चालविल्या आहेत. याचा चीनला फटका बसणार आहे.
चीनची धमकी
भारताची तैवानशी वाढती जवळीक चीनच्या डोळय़ात खुपत आहे. त्यामुळे भारताने सांभाळून पावले टाकावीत. चीनच्या हितांना बाधा येईल असे कोणतेही कृत्य करू नये. केल्यास परिणाम विपरीत होतील, अशा इशारेवजा धमक्या देण्यास चीनने प्रारंभ केला आहे. तथापि, भारत मागे हटणार नाही, अशी स्पष्टोक्ती सूत्रांनी केली आहे. येत्या काही महिन्यांमध्ये चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.









