डीएफ-17 सुपरसोनिक क्षेपणास्त्र तैनात
तैपैई/ वृत्तसंस्था
चीनचे सैन्य तैवानवर हल्ला करण्याची योजना आखत असल्याची माहिती समोर आली आहे. चीनने तैवानला लागून असलेल्या दक्षिणपूर्व किनाऱयावर नौसैनिकांची संख्या वाढविण्यास प्रारंभ केला आहे. चीन या भागातील एक दशकापासून अधिक काळापासून तैनात जुन्या डीएफ-11 आणि डीएफ-15 क्षेपणास्त्रांना हटवत आहे. त्यांच्या जागी आधुनिक सुपरसोनिक डीएफ-17 क्षेपणास्त्रांना तैनात केले जात आहे. ही क्षेपणास्त्रs अधिक पल्ल्यापर्यंत मारा करू शकतात.
उपग्रहीय छायाचित्रांद्वारे चीनच्या सज्जतेची माहिती कळते. चीनने ग्वांगडो आणि फुजियानच्या रॉकेट फोर्स बेस आणि मरीन कॉर्प्सवरील सुविधा वाढविल्या आहेत. या दोन्ही तळांवर मोठय़ा प्रमाणात शस्त्रास्त्रs तैनात करण्यात आले आहे. कॅनडाच्या कांन्वा डिफेन्स रिव्हय़ूनेही स्वतःकडे अशी उपग्रहीय छायाचित्रे असल्याचे सांगितले आहे.
अमेरिकेवर चीन नाराज
अमेरिकेन मागील काही काळापासून तैवानचे उघड समर्थन केले आहे. अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी क्रीथ क्रॅच सप्टेंबर महिन्यात तैवानच्या दौऱयावर गेले होते. या दौऱयात क्रॅच यांनी शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. दोन दिवसांपूर्वीच अमेरिकेची एक युद्धनौका तैवानच्या सामुद्रधुनीत गस्त घालताना दिसून आली होती. याप्रकरणी चीनने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग मंगळवारी गुआंगडोंग प्रांताच्या सैन्यतळावर पोहोचले होते. युद्धासाठी अत्युच्च पातळीवरील तयारी ठेवा, स्वतःच्या मनालाही युद्धासाठी सज्ज करा, असा आदेश त्यांनी सैनिकांना दिला आहे.
तैवानवर दावा
तैवानवर कधीच चीनच्या सत्तारुढ पक्षाचे नियंत्रण राहिलेले नाही. परंतु चीन तैवानला स्वतःचा हिस्सा मानत आला आहे. चिनी कम्युनिस्ट पक्ष तैवानवर हल्ला करण्ययाची धमकी देत राहिला आहे. चीनच्या विरोधामुळेच तैवान आतापर्यंत जागतिक आरोग्य संघटनेचा सदस्य होऊ शकलेला नाही. जागतिक संस्थेत दाखल होण्यासाठी तैवानला ‘एक चीन धोरण’ मानावे लागेल अशी अट चीनने ठेवली होती. परंतु तैवानने चीनची अट धुडकावून लावली होती. तैवानमध्ये डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी सत्तेवर आल्यापासून चीनसोबतचे संबंध खूपच बिघडले आहेत.









