शाहूनगर परिसरात मैला सोडताना पकडले होते वाहन : वाहनचालकाला समज-नोटीस
प्रतिनिधी / बेळगाव
शहरातील मैला शाहूनगर परिसरातील नाल्यांमध्ये सोडणाऱया वाहनधारकांचा शोध महापालिकेने घेतला असून, सदर वाहन महापालिकेच्या हंगामी वाहनचालकाचे असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सदर वाहनचालकाला समज देऊन नोटीस बजावण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. पण महापालिकेच्या हंगामी कामगारांकडूनच असा प्रकार घडत असल्याने सखेद आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
शहरातील सेफ्टीक टँकमधील मैला नेऊन शाहूनगर येथील शेतवडी परिसरात सोडण्यात येत होता. त्यामुळे मैला सोडू नये, अशी सूचना वाहनचालकाला परिसरातील रहिवाशांनी व शेतकऱयांनी केली होती. मात्र, सूचनेकडे दुर्लक्ष करून सेफ्टीक टँक मैलावाहू वाहनचालकाने आपली मनमानी सुरूच ठेवली होती. महापालिकेच्या नावाखाली वाहनचालकांनी हा व्यवसाय चालविला होता. शहरातील सेफ्टिक टँक रिकामी करून मैला व सांडपाणी ग्रामीण भागातील नाल्यांमध्ये सोडण्याचा प्रकार सुरू होता. त्यामुळे सोमवारी परिसरातील शेतकऱयांनी वाहनचालकांची अडवणूक करून याबाबत जाब विचारला. यापुढे मैला सोडू नये, अशी सूचना करून महापालिकेच्या अधिकाऱयांकडे तक्रार केली.
मात्र सदर वाहन महापालिकेचे नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सदर वाहनधारकाचा शोध घेण्यात आला. पण मैलावाहू वाहन महापालिकेच्या जेसीबी चालकाचे असल्याचे आढळून आले. सदर जेसीबी चालक महापालिकेत हंगामी तत्त्वावर कार्यरत आहे. त्यामुळे त्याला बोलावून आरोग्य अधिकाऱयांनी चांगलेच धारेवर धरले. अशाप्रकारे खुल्या जागेत मैला सोडण्यात आल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
शहरात महापालिकेव्यतिरिक्त तीन खासगी वाहने आहेत. या वाहनांद्वारे सेफ्टिक टँकमधील मैला उचलला जातो. यापैकी एक वाहन जेसीबी चालकाचे आहे. त्यामुळे जेसीबी चालकासह अन्य दोघा वाहनधारकांना बोलावून महापालिकेकडून परवानगी घेण्याची सूचना केली. कोणत्याही ठिकाणी मैला सोडू नये, नियम व अटींचे पालन करून मैल्याची विल्हेवाट लावावी, अशी सूचना वाहनधारकांना करण्यात आली आहे.