ऍड.रमाकांत खलप यांचे उद्गार
प्रतिनिधी/ फोंडा
कोकण मराठी परिषदेची स्थापना ज्या उद्देशाने करण्यात आली होती, ती सफल होण्यासाठी यापुढे कोमपची गोव्याच्या विविध तालुक्यामध्ये व्याप्ती करावी लागेल. कारवार, सीमा भाग, सावंतवाडी, वेंगुर्ला या कोकण पट्टय़ातही उपशाखा सुरु करुन हे कार्य विस्तारावे लागेल. तेव्हाच ही संकल्पना पूर्णत्वास येईल, असे आवाहन कोमपच्या सल्लागार मंडळाचे अध्यक्ष ऍड. रमाकांत खलप यांनी शेकोटी साहित्य संमेलनाच्या समारोप सोहळय़ात केले.
केरी-फोंडा येथील श्री विजयादुर्गा मंदिरच्या परिसयात आयोजित करण्यात आलेल्या 15 व्या शेकोटी साहित्य संमेलनाची काल रविवारी दुपारी सांगता झाली. समारोप सोहळय़ाला व्यासपीठावर पुणे येथील कवयित्री अंजली कुलकर्णी, कोमपचे अध्यक्ष सागर जावडेकर, सचिव चित्रा क्षीरसागर, कार्यवाह प्रा. नारायण महाले, विजयादुर्गा देवस्थानचे अध्यक्ष आनंद देसाई, सत्कारमूर्ती शिक्षिका सुधा ढवळीकर व निता म्हामाई कामत आदी मान्यवर उपस्थित होते.
भाषेच्या संवर्धनावर भर द्यावा लागेल
कोमपच्या कार्यात यापुढे युवा व तरुण पिढीचा सहभाग आवश्यक आहे. तसेच अशी संमेलने केवळ उपचार म्हणून साजरी न होता, त्यात साहित्याबरोबरच भाषेच्या संवर्धनासाठी विचार व्हायला पाहिजे. भविष्यात देशी भाषांचा वापर योग्य प्रकारे न झाल्यास त्या अस्थंगत होतील. जगभरातील अनेक बोली भाषा साहित्य निर्मिती अभावी इतिहासजमा झाल्या आहेत, असे सांगून महाविद्यालयीन विद्यार्थी व शिक्षकांचा अशा साहित्यिक उपक्रमात सहभाग वाढविण्याची सूचनाही त्यांनी केली. दोन दिवसांच्या संमेलनातील विविध सत्रांचा आढवा घेऊन शेकोटी संमेलनातून मिळणार ही उर्जा वर्षभर टिकवितानाच लिहिणारे हात जोडत जाण्याचे आवाहन त्यांनी केले.
म्हादई आटता कामा नये !
म्हादईच्या अस्थित्वासाठी सर्वांनी एकत्र येण्याचा मुख्य ठराव शेकोटी संमेलनाच्या व्यासपिठावरुन ऍड. खलप यांनी मांडला. म्हादईचा प्रवाह आटता कामा नये ! अशा शब्दात त्यांनी ठरावाचा मसुदा सादर केला. राजन घाटे यांनी त्याला अनुमोदन दिले व सर्व उपस्थितांनी टाळय़ांच्या गजरात तो संमत केला. म्हादईच्या या लढय़ात आता केवळ व्हॉट्सऍपवर पाठिंबा न देता तरुणाईने प्रत्यक्ष सहभाग होण्याचे आवाहन राजन घाटे यांनी केली. म्हादईच्या या ठरावाची प्रत गोवा व कर्नाटक राज्याच्या सरकारांना व केंद्र सरकारला पाठवली जाणार आहे. संमेलनात छायाचित्र प्रदर्शन मांडलेल्या आयडिया ग्रुपचे गौरीश नाईक यांनी संमेलनातील सृजनशिलता तर पुणे येथील सौ. लाळे यांनी संमेलनातील पाहुणचार विशेष भावल्याच्या सूचना मांडल्या.
शेकोटी संमेलन हे साहित्यिक यज्ञकुंड
शेकोटीची संकल्पना थंडीपासून उब मिळावी एवढय़ापुरती मर्यादित नसून एकप्रकारचा साहित्यिक यज्ञकुंड म्हणून त्याकडे पाहावे लागेल, असे अंजली कुलकर्णी यांनी समारोपाच्या भाषणात सांगितले. निसर्गाशी कसे समरुप व्हावे हे शेकोटी संमेलनाचे वैशिष्टय़ आहे. मोठय़ा संमेलनात जी आपुलकी व संवाद दिसत नाही, ते अशा छोटय़ा संमेलनातून आढळून येतात. संमेलनातील विषय जसे आषयसंपन्न होते तसेच महिला व युवा वर्गाचा सहभाग उल्लेखनीय असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रा. कृष्णाजी कुलकर्णी यांनी संमेलनाचे सूत्रसंचालन केले.
शिक्षण क्षेत्रात योगदान दिलेल्या सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षिका निता म्हामाई कामत व निवृत्त प्राथमिक शिक्षिका सुधा ढवळीकर यांचा ऍड. रमाकांत खलप यांच्याहस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कोमपतर्फे आपल्या कार्याची दखल घेतल्याबद्दल दोन्ही सत्कारमूर्तींनी समाधान व्यक्त केले. सागर जावडेकर यांनी सत्कारमूर्तींची ओळख करुन दिली.









