एकदा एक जहाज समुद्रातून जात होते. त्या जहाजात बरेच प्रवासी बसलेले होते. ते सर्व प्रवासी पर्यटक होते. समुद्राचा आणि आजूबाजूच्या निसर्गाचा आनंद घेत ते पर्यटक मौज-मजा करत होते. वेगवेगळय़ा गावातून आलेले पर्यटक बऱयाच काळापासून एकत्र राहिल्याने एकमेकांच्या परिचयाचे झाले होते. समुद्र आणि आजूबाजूचा निसर्ग किती सुंदर आहे याविषयी ते सगळे चर्चा करत होते. काही जण आपापल्या गावाचे वैशिष्टय़ एकमेकांना सांगत होते. त्यांच्यात एक मैत्रीचे नाते निर्माण झाले आणि थोडय़ाच काळात घनि÷ संबंध निर्माण झाले. परंतु, अति परिचयामुळे त्यांच्यात वाद होऊ लागले.
नियमितपणे जहाजातून हे पर्यटक समुद्रातून जात असत, वेगवेगळे ठिकाण पहात असत आणि संध्याकाळी त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी विश्रांतीसाठी येत असत. त्यांचा असा दिनक्रम पंधरा दिवस सुरू होता. शेवटच्या दिवशी पण अशाच प्रकारे, सकाळी हे सगळे पर्यटक जहाजातून प्रवासाला निघाले. त्यातील काही पर्यटकांचे एकमेकांशी वाद होऊ लागले. समुद्राचा आणि निसर्गाचा आनंद घेत ते संध्याकाळी परतत असताना अचानक समुद्रात खूप मोठे वादळ निर्माण झाले. जहाजावरील सारे पर्यटक घाबरून गेले. जहाजावरील इतर कर्मचारीही घाबरले. त्यांना काहीच सुचत नव्हते. सगळय़ांना वाटले की आता जहाजात पाणी शिरणार आणि आपण सगळे बुडणार. या सगळय़ा गोंधळात जहाजावरील एका कर्मचाऱयाने जहाजाचा प्रमुख असलेल्या कप्तानाला विचारले की, “साहेब, इतके मोठे वादळ आलेले असताना आपण एवढे शांत कसे आहात?’’ त्यावर त्या जहाजाच्या प्रमुखाने, कप्तानाने शांतपणे उत्तर दिले की, “संकट मोठे आहे पण माझा ज्या ईश्वरावर विश्वास आहे तो ईश्वर या संकटापेक्षाही अनंतपटीने मोठा आहे.’’ कर्मचाऱयाने पुन्हा विचारले की, “साहेब, आपली या वादळातून सुटका होणार का?’’ जहाजाच्या प्रमुखाने उत्तर दिले की, “हो. निश्चितच होणार. आपल्याला तारणारा परमेश्वर आहे.’’ कर्मचाऱयाने जहाजावरील सगळय़ा पर्यटकांना आणि इतर कर्मचाऱयांना जहाजाच्या प्रमुखाचा संदेश सांगितला आणि परमेश्वरावर विश्वास ठेवण्यास सांगितले. सगळय़ांनी सांगितल्याप्रमाणे परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि एकमेकांना धीर दिला. थोडय़ाच वेळात ज्या वादळाने रौद्ररूप धारण केले होते ते वादळ नष्ट झाले आणि जहाज सुखरूप समुद्र किनाऱयाला लागले. जहाजातील सगळय़ांचा जीव वाचला आणि त्यांची वादळातून सुखरूपपणे सुटका झाली. अब्राहम मास्लो यांनी सांगितलेली सामाजिक गरज म्हणजे नेमकी काय आहे हे आपल्याला वरील उदाहरणावरून लक्षात येईल. मनुष्यप्राण्याची जेव्हा शारीरिक आणि सुरक्षात्मक गरज पूर्ण होते तेव्हा त्याची सामाजिक गरज पूर्ण करण्यासाठी धडपड सुरू असते. व्यवस्थापन शास्त्राच्या दृष्टीने वरील उदाहरणाचा विचार केल्यास असे जाणवून येईल की, एखाद्या औद्योगिक समूहात किंवा उद्योगसंस्थेत काम करणारे कर्मचारी हे काही कालावधीपुरतेच एकत्र आलेले असतात. नियमितपणे त्यांना एकत्रितरित्या काम करावे लागत असल्याने त्यांच्यात घनि÷ संबंध निर्माण होतात आणि त्यामुळे एकमेकांचे गुणदोष समजल्याने त्यांच्यात वाद निर्माण होतात. परंतु, ज्यावेळी संस्थेवर किंवा उद्योग समूहावर खूप मोठे संकट येते त्यावेळी मात्र हेच कर्मचारी, अधिकारी, संचालक मंडळ आणि औद्योगिक संस्थेचा प्रत्येक घटक सामाजिक गरजेपोटी एकमेकांना धीर देत संकटाशी सामना करतात. यात कठीण प्रसंगी संस्थेत जे सुरुवातीला संकटाशी सामना करण्याकरिता सगळय़ांना धीर देतात, चैतन्य निर्माण करतात आणि एकोप्याची भावना तयार करतात तेच सर्वश्रे÷ असतात. संकटसमयी एकोप्याची भावना निर्माण करणारे हे संचालक असू शकतात, अधिकारी असू शकतात, कर्मचारी असू शकतात किंवा कामगारही असू शकतात. म्हणून उद्योगसंस्थेत काम करणाऱया प्रत्येक घटकाचा हुद्दा, पगार किंवा अधिकार वेगवेगळा असू शकतो पण त्या सर्वांचे स्थान आणि महत्त्व मात्र सारख्याच प्रमाणात असते.
श्री समर्थांनी सारशोधन समासात याविषयी खूप समर्पक रीतीने सांगितले आहे की,
गुप्त परीस चिंतामणी !प्रगट खडे कांचमणी !
गुप्त हेमरत्नखाणी !प्रगट पाषाण मृत्तिका !!
अव्हाशंख अव्हावेल !गुप्त वनस्पती अमोल !
येरंड धोत्रे बहुसाल !प्रगट सिंपी !
कोठे दिसेना कल्पतरू !उदंड सेरांचा विस्तारू !
पाहतां नाहीं मळीयागरू ! बोरि बाभळा उदंडी !! 11-12-13/ 09/06
याचा अर्थ असा की, परीस आणि चिंतामणी ही मौल्यवान रत्ने गुप्त असतात तर खडे आणि कांचेचे मणी कोठेही पडलेले सापडतात. सोन्याच्या, रत्नाच्या खाणी गुप्त असतात पण दगड-धोंडे मात्र सर्वत्र आढळतात. उजव्या बाजूला सोंड असलेला शंख, उजव्या बाजूने वाढणारा वेल किंवा दिव्य वनस्पती गुप्त असतात. तर एरंड, धोत्रा आणि शिंपल्या या हव्या तेवढय़ा कोठेही मिळतात.
व्यवस्थापनशास्त्राच्या दृष्टीने विचार केल्यास या ओव्यांचा अर्थ असा आहे की जेव्हा एखाद्या औद्योगिक संस्थेवर किंवा इतर कुठल्याही संस्थेवर जेव्हा अचानक संकटे उद्भवतात त्यावेळी त्या संस्थेतील कर्तृत्ववान लोकांची खरी ओळख पटते. तोपर्यंत संस्थेतील जे सामान्य श्रेणीतील लोक असतात तेच सर्वत्र बघायला मिळतात. म्हणून परिसासारखे, सोन्यासारखे आणि रत्नांच्या खाणीसारखे आपले अस्तित्व असायला हवे.
जर आपल्याला परीसासारखे व्हायचे असेल तर लोखंडाला सामावून घ्यायची इच्छाशक्ती असायला हवी. म्हणजेच, औद्योगिक संस्थेतील प्रत्येक घटकाला समजून घेण्याची क्षमता असायला हवी. ज्या गोष्टीला आपण प्रगल्भता असे म्हणतो ती गोष्ट आपल्याकडे असणे गरजेचे आहे. ज्या संस्थेचे आपण घटक आहोत त्या संस्थेतील इतरांचे अंतःकरण, त्यांचे अंतरंग जाणून घेणे महत्त्वाचे आहे. ज्यांना एखाद्या औद्योगिक संस्थेत सोन्यासारखे चमकायचे असेल त्यांना आधी संस्थेकरिता स्वतःला भट्टीत भाजून घ्यावे लागेल. म्हणजे, संस्थेच्या उत्कर्षाकरिता खूप कष्ट सोसावे लागतील आणि त्यानंतरच ते संस्थेतील इतरांना मार्गदर्शक ठरू शकतील. औद्योगिक संस्थेत ज्यांना खाणीतील रत्नांसारखे बनायचे असेल त्यांना वर्षानुवर्षे सतत कार्यरत रहावे लागते, तरच ते संस्थेतील अन्य घटकांकरिता आदर्श ठरतात. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या ओवीनुसार ज्यांचे आचरण आहे तेच परीसासारखे, सोन्यासारखे तसेच रत्नांच्या खाणीसारखे होऊ शकतात आणि औद्योगिक संस्थेला किंवा इतर कुठल्याही संस्थेला परमोच्च गतीला नेऊ शकतात. असे लोक मात्र प्रत्येक संस्थेत खूप दुर्मिळ असतात. त्यांना शोधायचे असेल तर मात्र डोळे आणि कान उघडे ठेवूनच कार्य करावे लागेल. मनःचक्षूंनीच हे साधता येऊ शकते. जे श्रीसमर्थांच्या दासबोधाचा सातत्याने अभ्यास करतात तेच हे साधू शकतात.
माधव किल्लेदार








