देवराज रेड्डीने प्रवृत्त केल्याचा कुटुंबीयांचा आरोप
वृत्तसंस्था/ हैदराबाद
तेलगू टीव्हीजगतातील अभिनेत्री कोंडापल्ली श्रावणी हिने स्वतःचे जीवन संपविले आहे. हैदराबाद पोलिसांनी तिच्या तक्रारीनंतर कुठलीच कारवाई न केल्याने श्रावणीने आत्महत्येचे पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. टिकटॉकवर भेटलेल्या देवराज रेड्डी या व्यक्तीकडून होत असलेल्या त्रासाला ती कंटाळली होती. 26 वर्षीय श्रावणीने हैदराबाद येथील स्वतःच्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे.
श्रावणीने मंगळवारी स्वतःला एका खोलीत कोंडून घेतले होते. बराचवेळ ती बाहेर न आल्याने कुटुंबीयांनी दरवाजा तोडला असता ती गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आली. श्रावणीला रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले आहे.
स्वतःचा कथित प्रियकर देवराज रेड्डीकडून मिळत असलेल्या धमक्यांना कंटाळून श्रावणीने हे पाऊल उचल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. परंतु पोलिसांनी तपासात दुर्लक्ष केल्याचा आरोप फेटाळला आहे. श्रावणी आणि देवराज यांच्या प्रेमसंबंधांना कुटुंबीयांची मान्यता नव्हती. याच मुद्दय़ावरून श्रावणीची मंगळवारी स्वतःची आई आणि भावाशी वादावादी झाली होती असा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. परंतु कुटुंबीयांनी आरोप केल्यावर पोलिसांचे एक पथक आंध्रप्रदेशच्या कंडिका शहरात देवराजला अटक करण्यासाठी पोहोचले आहे.
श्रावणीकडून 1 लाख रुपये घेऊन छायाचित्रे नष्ट करण्यास देवराज तयार झाला होता. परंतु तो आणखीन रकमेची मागणी करू लागला होता. श्रावणी याचमुळे त्रस्त होती आणि तिने 22 जून रोजी याप्रकरणी पुन्हा तक्रार नोंदविली होती अशी माहिती तिच्या कुटुंबीयांनी दिली आहे. मनासू ममता या टीव्ही शोमुळे श्रावणीला प्रसिद्धी मिळाली होती.









