ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
तेलंगणामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यााठी राज्य सरकारने आणखी दहा दिवस म्हणजेच 19 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यावेळी काही निर्बंधांमध्ये सूट देण्यात आली आहे. या अंतर्गत आता सकाळी 6 वाजल्यापासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत नागरिकांना सूट देण्यात आली आहे. मात्र सायंकाळी 6 ते सकाळी 5 वाजेपर्यंत लॉकडाऊन जारी असणार आहे.

तर राज्यातील सीमाभागात म्हणजेच खम्माम, नालगोंडा आणि नागार्जुन सागर या भागांमध्ये दुपारी दोन वाजेपर्यंतच सूट देण्यात आली आहे. या भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे. दरम्यान, संपूर्ण राज्यात कोरोना रोखण्यासाठी लावण्यात आलेले नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असणार आहे.
- कोरोना रुग्णांची एकूण संख्या 5,95,000 वर
दरम्यान, तेलंगणामध्ये मागील 24 तासात 1,857 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 15 जणांचा मृत्यू झाला. कालच्या दिवशी 2,982 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यात आतापर्यंत 5,67,285 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत एकूण 3,409 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सद्य स्थितीत 24,306 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.









