हैदराबादमध्येही बद्रीनाथचा होणार जयजयकार : उत्तराखंडच्या 6 हजार कुटुंबीयांकडून निर्मिती
वृत्तसंस्था / हैदराबाद
भगवान बद्रीनाथ उत्तराखंडच्या लोकांचे आराध्य दैवत आहेत. रोजगारापोटी उत्तराखंडमधील सुमारे 6 हजार कुटुंबे तेलंगणाच्या हैदराबादमध्ये राहत आहेत. या लोकांना भगवान बद्रीनाथाचे दर्शन कालांतरानेच करणे शक्य होते. याचमुळे या लोकांकडून हैदराबादमध्येच सुमारे 60 लाख रुपयांच्या खर्चातून बद्रीनाथ धामसारखे मंदिर उभारण्यात येत आहे.
मंदिराची उभारणी भाविकांच्या दानातून उत्तराखंड कल्याणकारी संस्थेमार्फत होत आहे. हैदराबादमधील मेडचल या ठिकाणी हे मंदिर उभारण्यात येत आहे. मंदिराच्या उभारणीचे कार्य 80 टक्के पूर्ण झाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष विक्रम सिंग उनाल यांनी दिली आहे. 2021 च्या प्रारंभी मंदिराची उभारण पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.
6750 चौरस फूट क्षेत्रात उभारणी
भगवान बद्रीनाथ यांचे मंदिर 6,750 चौरस फुटात उभारण्यात येत आहे. मंदिर दोनमजली असणार असून याची उंची 50 फूट राहणार आहे. तळमजल्यावर मंदिराचे भव्य सभागृह तयार करण्यात आले असून यात सुमारे 350 लोकांच्या बसण्याची व्यवस्था राहणार आहे. पहिल्या मजल्यावर भगवान बद्रीनाथ स्वतःच्या बद्रीश पंचायतसह विराजमान होणार आहेत. त्यांच्या पंचायतमध्ये योगमुद्रेतील बद्रीनाथ, भगवान गणेश, भगवान कुबेर, भगवान बलराम, लक्ष्मीदेवी, नर-नारायण, नारदमुनी, गरुड यांची मूर्ती प्रतिष्ठापित केली जाणार आहे. परिसरात भगवान गणेश, लक्ष्मीदेवी आणि नवग्रहांसाठी स्वतंत्र मंदिरही उभारण्यात येणार आहे.
समुदाय भवन
मंदिराची उभारणी 2018 पासून सुरू आहे. मंदिरानजीकच 7,200 चौरस फुट क्षेत्रात समुदाय भवन निर्माण करण्यात येणार आहे. मंदिरासाठी राजेंद्र प्रसाद डोवाल यांनी 1,800 चौरस फूटांचा भूखंड दान केला आहे. या भूखंडावर गोशाळेसह मंदिरात काम करणाऱया लोकांच्या वास्तव्याची सुविधा निर्माण करण्यात येणार आहे.
सर्व उत्सव साजरे होणार
उत्तराखंडच्या बद्रीनाथ धाममध्ये साजरे होणारे सर्व उत्सव हैदराबादमध्ये साजरे करण्यात येणार आहेत. या मंदिरातही बद्रीनाथ धामप्रमाणेच धार्मिक विधी पार पडणार आहेत. हैदराबादमध्ये उत्तराखंडमधील सुमारे 6 हजार कुटुंबांचे वास्तव्य आहे. यातील बहुतांश लोक शासकीय तसेच खासगी संस्थांमध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत.









