प्रतिनिधी/बेळगाव :
हिरेबागेवाडी येथील एका तेरा वर्षाच्या मुलीला कोरोनाची लागण झाली आहे. गुरुवारी सकाळी आरोग्य विभागाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये यासंबंधीची माहिती देण्यात आली असून यामुळे जिल्हय़ातील बाधितांची संख्या 74 वर पोहोचली आहे. तर हिरेबागेवाडी व कुडची येथील दोघे जण कोरोनामुक्त झाले आहेत.
रुग्ण क्रमांक 364 च्या संपर्कातून हिरेबागेवाडी येथील तेरा वषीय मुलीला कोरोनाची बाधा झाली आहे. सकाळी यासंबंधीचा अहवाल येताच खासगी वसतीगृहातून तिला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात हलविण्यात आले. तिच्या कुटुंबातील आणखी काही जण या वसतीगृहात आहेत.
हिरेबागेवाडी येथील बाधितांची संख्या 37 वर पोहोचली असून नवी दिल्ली येथील निजामुद्दिन मरकजमधील धार्मिक कार्यक्रमात भाग घेऊन गावी परतलेल्या एका तरुणाच्या संपर्कातून गावात मोठय़ा प्रमाणात कोरोनाचा फैलाव झाला आहे. आता या तेरा वर्षीय मुलीच्या कुटुंबीयांच्या स्वॅब तपासणीचे अहवाल अद्याप यायचे आहेत.
दरम्यान, हिरेबागेवाडी येथील रुग्ण क्रमांक 284 व कुडची येथील रुग्ण क्रमांक 300 असे दोघे जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे गुरुवारी त्यांना घरी पाठविण्यात आले आहे, अशी माहिती बिम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. विनय दास्तीकोप्प यांनी दिली आहे. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 36 वर पोहोचली आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 74 वर पोहोचली आहे. त्यापैकी 36 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर हिगेबागेवाडी येथील एका वृद्धेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. उर्वरित बाधितांवर सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत.
आणखी 219 अहवालांची प्रतीक्षा
जिल्हा सर्वेक्षण विभागाने रात्री बुलेटिन प्रसिद्ध केले आहे. जिल्हय़ातील आणखी 219 जणांचे अहवाल अद्याप यायचे आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. आरोग्य विभागाने आतापर्यंत 7 हजार 176 जणांच्या आरोग्यावर लक्ष ठेवले आहे. 3 हजार 816 जणांना चौदा दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे तर 37 बाधितांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत.









