शिमगोत्सवात होणार जल्लोष
प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हय़ात शिमगोत्सव मोठय़ा उत्साहात सुरू झाला आहे. आजपासून प्रारंभ होणारे ‘तेरसे’ मोठय़ा दणक्यात गावोगावी साजरे होणार आहेत. तर धुलिवंदनाच्या दिवशी पौर्णिमेचे (भद्रेच्या मुहूर्तावर) शिमगे मंगळवार 7 मार्चपासून साजरे करण्यात येणार आहेत. त्यामुळे रत्नागिरी शहर आसपासच्या गावांतील काही निवडक पालख्या रत्नागिरीतील बारावाडय़ांचे ग्रामदैवत असलेल्या श्री देव भैरीला भेटावयास येत असल्यामुळे शहर परिसर ढोल-ताशांच्या गजराने निनादून जात आहे.

शिमगोत्सव म्हणजे त्या-त्या गावांच्या देवतांचा उत्सव. साऱया गावकऱयांच्या आनंदाचा उत्सव जिल्हय़ात मानला जातो. सारे चाकरमानी या उत्सवाच्या निमित्ताने जगाच्या पाठीवर कुठेही असोत, पण हा गावाकडचा उत्सव चुकवत नाहीत. गावच्या देवाच्या दर्शनासाठी शिमग्याच्या निमित्ताने आवर्जून चाकरमान्यांचे पाय गावाकडे वळतात. त्यामुळे गावच्या या उत्सवाचा डामडौल मोठा असतो. त्यामुळे गावकरी, चाकरमानी असे सारेच हा उत्सवाच्या नियोजनात व्यस्त झाले आहेत. या उत्सवात पालखी सोहळय़ांची धुळवड रंगणार आहे.
यावर्षीचा जिल्हय़ातील शिमगोत्सव मोठय़ा दिमाखात साजरा करण्यासाठी सारे जिल्हावासीय आतूर, सज्ज झाले आहेत. कोकणातील प्रमुख दोन सणांपैकी एक असलेल्या शिमगोत्सवाचा माहोल सर्वत्र सुरू आहे. गावागावातील ग्रामदेवतांच्या पालख्या डौलाने रुपे लावून सजल्या आहेत. जिल्ह्य़ात 1399 पालख्या धूलिवंदनापर्यंत व त्यापुढेही अगदी गुढीपाडव्यादरम्यानच्या काळात भक्तांच्या भेटीला घरोघरी येणार आहेत. तर जिल्हय़ात 1315 ठिकाणी सार्वजनिक तर 2854 ठिकाणी खासगी होळय़ा उभारण्यात येणार आहेत. फाकपंचमीनंतर ग्रामदेवतांच्या पालख्या रुपे लावण्याचा कार्यक्रम अजूनही अनेक गावांत सुरू आहे. रुपे लावल्यानंतर पालख्या भक्तांना दर्शनासाठी बाहेर पडतात.
रत्नागिरी शहरानजीकच्या गावोगावच्या अनेक पालख्या रत्नागिरी शहरातील बारावाडय़ांच प्रसिध्द ग्रामदैवत श्री देव भैरीबुवाच्या भेटीला मोठय़ा डामडौलात ढोल-ताशांच्या गजरात येत असतात. त्यानंतर त्या आपापल्या गावी शिमगोत्सवासाठी परततात. जवळपासच्या गावातील अनेक पालख्या पायी तर काही पालख्या टेम्पो अथवा ट्रकमधून येतात. शहरातील मारूती मंदिर, जयस्तंभपासून पालख्या श्री देव भैरी मंदिरापर्यंत ढोल-ताशांच्या गजरात पायी नेल्या जात असतात. शहरात विविध पालख्या येणार असल्यामुळे श्री देव भैरी देवस्थानतर्फे त्या बाबतचे नियोजन करण्यात येते. यावर्षी या पालखी भेटीचे सोहळे रंगू लागले आहेत.
शिमगोत्सवासाठी चाकरमानी मोठय़ा संख्येने गावाकडे
तेरसे शिमगोत्सवास सुरूवात झाली आहे. त्यामुळे नोकरी, व्यवसायानिमित्त मुंबई व अन्य शहरात स्थायिक असलेली मंडळी गावी परतू लागली आहेत. त्यामुळे ग्रामदेवतेचा हा उत्सव, घरी येणाऱया पालखीच्या स्वागतासाठी ग्रामस्थांमध्ये, चाकरमान्यांमध्ये मोठय़ा उत्साहाचे वातावरण आहे.









