वार्ताहर/ राजापूर
राजापूर तालुक्यातील तेरवण, थोरलीवाडी, तेलीवाडी येथे गोठय़ाला अचानक आग लागून लाखो रूपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. तेरवण येथील मधुकर सखाराम खानविलकर यांच्या मालकीचा हा गोठा असून गोठय़ाला आग लागल्याचे लक्षात येताच गोठय़ातील बैल सोडण्यात आल्याने सुदैवाने जिवीतहानी टळली.
रविवारी सकाळी 9.30च्या दरम्यान अचानक ही आग लागली. त्यावेळी मधुकर खानविलकर यांच्या गोठय़ात एक बैल बांधलेला होता तर अन्य जनावरे चरण्यासाठी सोडण्यात आली होती. गोठय़ाला आग लागल्याचे लक्षात येताच अनेकांनी गोठय़ाच्या दिशेने धाव घेत प्रसंगावधान राखत आत प्रवेश करुन बांधलेला बैल सोडला व त्याला जीवदान दिले.
लागलेल्या आगीत गोठा मालक खानविलकर यांच्या जवळपास शंभराहून अधिक गवताच्या वरंडी जळून खाक झाल्या आहेत. शिवाय गोठय़ाची बारे, वासे, रिपा देखील आगीत खाक झाल्या आहेत व कौले फुटली आहेत. आग नेमकी कशी लागली ते स्पष्ट झालेले नाही. यामध्ये सुमारे लाखाच्या आसपास नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे.









