प्रतिनिधी/उस्मानाबाद
तेरणा कारखान्याच्या 35 हजार शेतकरी सभासदांच्या हितासाठी तसेच त्यावर आधारीत दीड हजार कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी हा कारखाना सूरु होणे ही काळाची गरज आहे. त्यातच यावेळी अत्यंत चांगले पर्जन्यमान झाल्याने ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. अशा काळात हक्काचा कारखाना सुरु झाल्यास परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. कारखाना भाडेतत्वावर देताना अनामत रक्कमेतुन कामगारांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम प्रथम अदा करण्याची अट घालण्याचा पर्याय समोर आहे.
या संदर्भात 2 फेब्रुवारी रोजी जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास घाडगे पाटील व जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश (दाजी) बिराजदार यांनी माजी केंद्रीय कृषीमंत्री, खासदार शरद पवार साहेब यांची मुंबई येथिल सिल्व्हर ओक बंगल्यावर भेट घेतली होती.
पवार यांच्या सूचनेनुसार खासदार ओमराजे निंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास घाडगे पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुरेश (दाजी) बिराजदार, उस्मानाबाद नगरचे नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदूभैय्या राजेनिंबाळकर यांनी दि. 17 मार्च 2021 रोजी श्रमशक्ती भवन नवी_दिल्ली येथे तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना सुरू करण्या संदर्भात केंद्रीय रोजगार व भविष्य निर्वाह निधी मंत्री संतोषजी गंगावार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा झाली होती. तेरणा कारखाना चालू करण्याच्या दृष्टीने भविष्य निर्वाह कार्यालयास सहमती पत्र देण्यासाठी केंद्र सरकारने आदेश द्यावेत अशी मागणी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दि. 24 मार्च 2021 रोजी लोकसभेत शून्य प्रहारच्या माध्यमातून उपस्थित केली.
Previous Articleगौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांचा लिलाव
Next Article कर्नाटक विधानसभेचे अधिवेशन अनिश्चित काळासाठी तहकूब









