ऑनलाईन टीम / मुंबई :
शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. तेजस ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी दिलेल्या शुभेच्छांची राजकीय वर्तुळात सकाळपासूनच जोरदार चर्चा आहे.
शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी सामना वृत्तपत्रातून तेजस ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांना वेस्ट इंडिजचे आक्रमक फलंदाज व्हिव्हियन रिचर्डस् यांची उपमा दिली आहे. ‘ठाकरे कुटुंबाचे व्हिव्हियन रिचर्डस् तेजस ठाकरे यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा’, असा मजकूर सामना वृत्तपत्रात देण्यात आला आहे. त्यामुळे तेजस ठाकरे यांच्या राजकीय प्रवेशाची ही नांदी आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला.
दरम्यान, तेजस ठाकरे राजकारणात सक्रीय होणार असल्याच्या चर्चा मात्र मिलिंद नार्वेकर यांनी फेटाळून लावल्या आहेत. ठाकरे कुटुंबात तेजस ठाकरे आक्रमक आहेत म्हणून त्यांचा उल्लेख व्हिव्हियन रिचर्डस् म्हणून केला आहे. तर, आदित्य ठाकरे हे सुनील गावस्कर प्रमाणे संयमी आहेत, असेही मिलिंद नार्वेकर यांनी सांगितले आहे.
- हसत हसतच आदित्य ठाकरे म्हणाले…
दरम्यान, यासंदर्भात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी आदित्य ठाकरेंना विचारणा केली असता त्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. जाहिरातीमध्ये तेजस ठाकरेंना व्हिव्हियन रिचर्ड्स यांची उपमा का दिली आहे? असा प्रश्न विचारताच आदित्य ठाकरे हसत हसतच ‘कशासाठी ही उपमा दिली तेच मीही बघतोय’. तर, मिलिंद नार्वेकरांनी आदित्य ठाकरेंना देखील सुनील गावस्कर यांची उपमा दिल्याबाबत विचारले असता आदित्य ठाकरे यांनी ‘ते तुम्ही त्यांनाच विचारा’ असे म्हणून ते हसत हसत निघून गेले.








