बोरगाव पोलीस ठाण्याची धडाकेबाज कारवाई
प्रतिनिधी / नागठाणे
अष्टे(पुनः) ता. सातारा येथील अल्पवयीन युवक तेजस विजय जाधव याच्या खंडणी व खून प्रकरणातील चार संशयितांवर मोक्का लावण्यात आला आहे. साहिल रुस्तम शिकलगार (वय 21), आशिष बन्सीलाल साळुंखे (वय 23, दोघे रा. नागठाणे, ता. सातारा), शुभम संभाजी जाधव (वय.23, रा.मोळाचा ओढा, सातारा) व अमित राजेंद्र शेख उर्फ गायकवाड (वय 30, रा. झेड.पी. कॉलनी, शाहूपुरी, सातारा) अशी मोक्काआंतर्गत कारवाई झालेल्या संशयितांची नावे आहेत. बोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत मोक्काअंतर्गत कारवाईची पहिलीच धडाकेबाज कारवाई करण्यात आली आहे.
तेजस जाधव खंडणी व खून प्रकरणामुळे नागठाणे परिसर पूर्णपणे ढवळून निघाला होता. या प्रकरणी नागठाणे (ता. सातारा) येथील सराईत गुंड साहिल शिकलगार, आशिष साळुंखे यांच्यासह शुभम जाधव व अमित शेख उर्फ गायकवाड यांच्या बोरगाव पोलिसांनी स्थनिक गुन्हे शाखेच्या मदतीने मुसक्या आवळल्या होत्या. हे चारही संशयित पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुंड असून त्यांच्या विरोधात बोरगाव, सातारा तालुका, उंब्रज व शाहूपुरी या पोलीस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, खंडणी, विनापरवाना ग्नशस्त्र (बंदूक) वापरणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत.
जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते, अपर पोलीस प्रमुख धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी या चौघा संशयितांविरोधात कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांच्याकडे मोक्कांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पाठविला होता. नुकताच विशेष पोलीस महासंचालकांनी या प्रस्तावास मंजुरी दिली. संशयितांवर मोक्काआंतर्गत कारवाई होण्यासाठी बोरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत माळी यांनी विशेष परिश्रम घेतले.








