वृत्तसंस्था/ पाटणा
बिहार निवडणूक निकालानंतर पाटणा येथे तेजस्वी यादव यांना महाआघाडीच्या विधिमंडळ नेतेपदी निवडण्यात आले आहे. बिहारची जनता आमच्यासोबत आहे, आम्ही हरलो नसून आम्हाला हरविण्यात आल्याचे म्हणत तेजस्वी यांनी पोस्टल मतांची पुनर्मोजणी करण्याची मागणी केली आहे.
जनमत महाआघाडीसोबत होते, परंतु निवडणूक आयोगाचा निकाल रालोआच्या बाजूने होता, असे पहिल्यांदाच घडलेले नाही. 2015 मध्ये महाआघाडी असताना मते आमच्या बाजूने होती, परंतु भाजपने सत्ता मिळविण्यासाठी मागील दाराने प्रवेश केला होता, असे विधान तेजस्वी यांनी केले आहे.
सर्व उमेदवारांना वाटणारा संशय दूर करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. पुनर्मोजणी अत्यंत आवश्यक आहे. तसेच चित्रिकरणही आम्हाला दाखविण्यात यावे. 2015 मध्येही नितीश कुमार यांनी जनमताचा अनादर केला होता. नितीश यांना सत्ता प्रिय असून ते छळ-कपटाने ती मिळवितात. जनतेने आमचा रोजगाराचा मुद्दा स्वीकारला आहे. जनतेच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. आम्ही हरलो नाही तर जिंकलो आहोत. धन्यवाद यात्रा काढून बिहारच्या जनतेचे आभार मानणार असल्याचे तेजस्वी म्हणाले.
मतांमध्ये मोठा फरक
रालोआला 1 कोटी 57 लाख मते मिळाली आहेत, म्हणजेच 37.3 टक्के मते रालोआला प्राप्त झाली. परंतु महाआघाडीला 1 कोटी 56 लाख 88 हजार 458 मते मिळाली आहेत. महाआघाडीला 37.2 टक्के मते प्राप्त झाली आहे. रालोआ आणि महाआघाडी यांच्यातील मतांचा फरक 12 हजारांचा असल्याचे तेजस्वी यांनी म्हटले आहे.
10 मतदारसंघांच्या निकालात फेरफार
रालोआ सरकारने आश्वासनांच्या अनुरुप काम न केल्यास आंदोलन करण्यात येईल. सरकारने 19 लाख नोकऱया न दिल्यास, बिहारच्या लोकांना औषध, सिंचन, शिक्षण आणि कमाई न दिल्यास महाआघाडीकडून मोठे आंदोलन करण्यात येणार आहे. 10 मतदारसंघांमध्ये निकालात फेरफार करण्यात आल्याचे म्हणत तेजस्वी यांनी पोस्टल मतांच्या मोजणीवर सवाल उपस्थित केला आहे.