वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमेरिकेतील अॅरिझोना येथे झालेल्या जिम क्लिक शूटआऊट आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताचा अॅथलिट तसेच राष्ट्रकुल स्पर्धेत उंचउडीत पदक मिळविणाऱ्या तेजस्वीन शंकरने डेकेथलॉनमध्ये रौप्यपदक पटकाविले. पण त्याचा राष्ट्रीय विक्रम थोडक्यात हुकला.
2022 च्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या उंचउडीमध्ये कांस्यपदक मिळविणाऱ्या तेजस्वीन शंकरने पुरुषांच्या डेकेथलॉन या दहा क्रीडा प्रकारांच्या स्पर्धेत एकूण 7 हजार 648 गुण घेत रौप्यपदक मिळविले. मात्र, त्याला 2011 साली भरतिंदर सिंगचा 7 हजार 658 गुणांचा राष्ट्रीय विक्रम पार करता आला नाही. अमेरिकेतील ही स्पर्धा अॅरिझोना विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात चालू आहे. पुरुषांच्या डेकेथलॉन या क्रीडा प्रकारात नेब्रेस्काच्या टिल स्टेनफोर्थने 7 हजार 845 गुणांसह सुवर्णपदक घेतले. आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत दिल्लीचा तेजस्वीन शंकर डेकेथलॉन या क्रीडा प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.









