चीन अन् दक्षिण कोरियाच्या विमानांना टाकले मागे
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताचे हलके लढाऊ विमान ‘तेजस’ मलेशियाची पहिली पसंत म्हणून समोर आले आहे. हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आर. माधवन यांनी रविवारी यासंबंधी माहिती दिली आहे. मलेशिया स्वतःच्या जुन्या लढाऊ विमानांच्या ताफ्याला बदलण्याचा विचार करत आहे. तेजसच्या खरेदीवरून दोन्ही देशांदरम्यान बोलणी सुरू असल्याचे माधवन यांनी सांगितले आहे.
चीनच्या जेएफ-17, दक्षिण कोरियाचे एफए-50 आणि रशियाच्या मिग-35 सोबत याक-130 बरोबर चुरशीची प्रतिस्पर्धा असूनही मलेशियाने भारतीय विमानाला पसंती दर्शविली असल्याचे माधवन यांनी एका मुलाखतीत नमूद केले आहे.
भारताने क्यवहाराच्या अंतर्गत मलेशियात रशियन बनावटीच्या एसयू-30 लढाऊ विमानांच्या ताफ्यासाठी एक एमआरओ (देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरऑल) सुविधा स्थापन करण्याचाही प्रस्ताव दिला आहे. युक्रेनवर आक्रमण केल्याने रशियावर सध्या पाश्चिमात्य देशांचे निर्बंध आहेत, अशा स्थितीत भारताचा हा प्रस्ताव मलेशियासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. रशियाकडून विमानाच्या सुटय़ा भागांच्या खरेदीत सध्या अडथळे निर्माण झाले आहेत. मलेशियासोबत भारताचा करार लवकरच होण्याची शक्यता असल्याचे माधवन म्हणाले.
करारावर शिक्कामोर्तब झाल्यास तो विमानाच्या अन्य संभाव्य खरेदीदारांसाठी एक चांगला संकेत देणार आहे. या व्यवहारामुळे तेजसच्या समग्र निर्यात क्षमतेलाही चालना मिळणार आहे. दोन्ही देशांमधील ही चर्चा जवळपास अंतिम टप्प्यात आहे. रशिया व्यतिरिक्त एसयू-30 विमानांसाठी मदत पुरविण्याचा प्रस्ताव देणारा भारत एकमात्र देश असल्याचे माधवन यांनी म्हटले आहे.
तेजसची खरेदी प्रक्रिया पुढे नेण्यासाठी उच्चाधिकारी आणि तज्ञांचे एक पथक लवकरच भारतात येणार आहे. मलेशिया स्वतःच्या जुन्या रशियन बनावटीच्या मिग-29 लढाऊ विमानांच्या ताफ्याला बदलण्यासाठी विमानांची खरेदी करणार आहे. मलेशिया किती विमानांच्या खरेदीचा विचार करत आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. जेएफ-17 आणि एफए-50 च्या तुलनेत तेजस अत्यंत उत्कृष्ट विमान आहे. तेजस एचएएलकडून निर्मित बहुउद्देशीय सुपरसोनिक विमान असून अत्यंत धोकादायक स्थितीतही उड्डाण करण्यास सक्षम असल्याची माहिती माधवन यांनी दिली आहे.
मागील वर्षी फेब्रुवारीत संरक्षण मंत्रालयाने भारतीय वायुदलासाठी 83 तेजस लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी एचएएलसोबत 48 हजार कोटी रुपयांचा करार केला होता. भारताने तेजसच्या एमके 2 आवृत्तीसह पाचव्या पिढीचे अत्याधुनिक मध्यम लढाऊ विमान विकसित करण्यासाठी 5 अब्ज डॉलर्सच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर काम करण्यास सुरुवात केली आहे.









