अध्याय अकरावा
भगवंत उद्धवाला म्हणाले, अत्यंत आवडीने माझी भक्ती करायची असेल तर अनेक प्रकारच्या आनंददायक पद्धतींनी माझे गुण, कीर्ति व नाम यांचे स्मरण करावे. माझ्या भजनानेच कृतकृत्यता होते असा मनामध्ये ठाम विश्वास बाळगून रात्रंदिवस न थकता माझ्या भजनामध्येच सर्वस्वी प्रवृत्त व्हावे. माझ्या भजनाच्या आवडीने मनात समाधानालासुद्धा जागा रहात नाही म्हणजे भजन पूर्ण झाले असे समाधान वाटून थांबावे असे वाटत नाही. एक क्षणसुद्धा वाया जाऊ न देणे यालाच भजनाचा सुकाळ असे म्हणतात.
माझ्या भजनामध्ये जरी विशेष प्रेम असले, तरी वैदिक, लौकिक किंवा दैहिक असे नित्य-नैमित्तिक कर्म सोडू नये. ते करत असताना माझ्या भजनामुळे भक्ताची चित्तशुद्धी झालेली असल्याने भक्तांना ते कर्म काही बाधक होत नाही. मात्र सर्व कर्म आचरण करताना फलाच्या आशेची कल्पना करू नये, हेच भक्ताचे गुह्य वर्म असून ते जाणणे हाच अत्युत्तम अधिकार आहे. जो कंटाळा न करता माझ्यावर भक्ती ठेवून सर्व काम करतो आणि फळाची आशा कधीही धरीत नाही, त्यालाच हा अत्युत्तम अधिकार मिळतो. आवडीने कर्मे केली असता पुढे फलाशाही उत्पन्न होत नाही. माझे भजन करू लागले असता ज्ञानाचीही काही कमतरता पडत नाही. माझ्या भक्तांना माझ्यावर भक्ती ठेवून माझे भजन केल्यानेच नित्यमुक्तता प्राप्त होते. ज्ञानाशिवाय भक्ती घडत नाही असे जे म्हणतात, ते केवळ शब्दज्ञान होय.
भक्तीनेच प्रत्यक्ष, अपरोक्ष ज्ञानाची प्राप्ती होते असे समज. म्हणून माझे भजन करताना भक्तांना ज्ञानाची उणीव पडत नाही. घरादारात वागले तरी माझ्या भक्तांना बंधन घडत नाही. भगवंतांनी उद्धवाला सांगितलेले हे भक्तीचे महत्त्व निरनिराळय़ा संतांच्या अभंगातील त्यांनी व्यक्त केलेले विचार पहिले की, लगेच लक्षात येते ज्याच्या तोंडात माझे नाम असते, त्याला माझ्या भजनाचा नाद असतो. मी आत्माराम ज्याच्या मनामध्ये असतो, त्याच्या घरी मुक्तीच दासीचे काम करीत असते पण ज्याची वृत्तीच निर्विषय झालेली असते, त्याला मुक्तीमध्ये विशेष ते काय? भक्तांना कोणत्याही कर्मामध्ये विषयाचे स्फुरण नसते. भक्तांचे चित्त विषयामध्ये नसते. मी भगवंत हाच त्यांचा विषय. ते नेहमी माझ्यामध्येच लोलुप असतात, म्हणून ते नित्यमुक्तच असतात.
भक्तांनी विषयाचे सेवन केलेतरी ते तो विषय घासाघासाला मलाच अर्पित असतात आणि सर्व प्राणिमात्रांमध्ये त्यांना माझीच भावना भासते, म्हणूनच त्यांना मुक्ती वंदन करते. माझ्या भक्तांना कर्मबंधन तर लागत नाहीच, पण माझे स्मरण आणि कीर्तन करीत असतानाच साऱया जगाचेही बंधन तोडून टाकतात. माझ्या भक्तांचे जे राहते घर असते, तेच माझे स्वतःचे घर हे लक्षात ठेव. त्याच्या दाराशी अष्टौप्रहर मुक्ती हात जोडून उभी असते. माझे भजन करू लागले असता कोणत्याच गोष्टीची दुर्लभता राहात नाही. चारही पुरुषार्थांपेक्षा भक्ती मला फार आवडती आहे. ज्ञान, नित्यानित्यविवेक आणि भक्ती यामध्ये माझे अत्यंत प्रेम असते. त्याचप्रमाणे प्रेमळ भक्तांचेही मला रात्रंदिवस अधिकाधिकच सुख वाटते. ज्याप्रमाणे एकुलते एकच मूल असले म्हणजे ते आईला अधिक आवडते, त्याप्रमाणे प्रेमळ भक्तांचे कौतुक करणे यातच मला अत्यंत सुख वाटते. ह्याकरिता प्रेमळ भक्ताला मी तत्काळ आपल्या आश्रयाखाली घेतो, आणखी वर त्याला आत्मसुख देतो. ते त्याने न घेतल्यास शेवटी मी त्याचा चाकर होतो.
प्रेमाच्या अतिशय आवडीने ज्याने आपली चित्तवृत्ती मला अर्पण केली, त्याची सेवा करण्याचा निश्चित विचार मी खरोखर त्याचवेळी केला म्हणून समज. प्रेमळ भक्तांचे उच्छिष्ट खाताना किंवा त्यांची घोडी धुताना मला काही लाज वाटत नाही. फार काय सांगावे? पण अखेरीस त्याच्या घरची उष्टी काढतानासुद्धा मला मुळीच लाज वाटत नाही. प्रेमळ भक्तांची मला इतकी आवड आहे की त्यांचे जोडेसुद्धा मी मस्तकावर घेतो. अशी प्रेमळांची गोष्ट सांगता सांगता श्रीकृष्णालाही प्रेमाचे भरते आले.
क्रमशः







