डॉ. संध्या देशपांडे : चित्पावन संघातर्फे कार्यक्रम : आयएमईआरच्या सभागृहात आयोजन
प्रतिनिधी /बेळगाव
मराठी नाटय़सृष्टीच्या गेल्या तीनशे वर्षांतील इतिहासात अनेक स्थित्यंतरे घडली. अनेक प्रयोग झाले, मन्वंतरे झाली. मात्र, विजय तेंडुलकरांपासून मराठी नाटकाचा आत्मशोध सुरू झाला, असे प्रतिपादन प्रा. डॉ. संध्या देशपांडे यांनी केले. चित्पावन संघाचा 47 वा वर्धापन दिन, तसेच भगवान परशुराम जयंती, जगद्गुरु बसवेश्वर जयंती, छत्रपती शिवाजी महाराज जयंती अशा संयुक्त कार्यक्रमात त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष गोविंद फडके होते.
आयएमईआरच्या हिंदवाडी येथील सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात मंत्रघोषात भगवान परशुराम प्रतिमेचे पूजन करून झाली. मुकुंद भिडे व मुकुंद जोशी यांनी भार्गव गीत सादर केले तर विद्या फाटक यांनी परशुराम गीत गायिले.
डॉ. देशपांडे म्हणाल्या, विष्णूदास भावे यांच्या आधी 100 वर्षे मराठी नाटय़ परंपरा सुरू झाली. त्यामागे कोकणातील दशावतारी, सोंगी, भजन, कीर्तन, लोककला यांचा आधार होता. 1857 पूर्वीही महाराष्ट्र व मध्य प्रांतात मराठी नाटकांचे प्रयोग होत होते. तंजावरचे सरफोजी राजे हे नाटककार होते. त्यांनी तब्बल 10 नाटके लिहिली. त्यामुळे कर्नाटकातील यक्षगानातून मराठी नाटकांनी प्रेरणा घेतली, हा समज असत्य ठरतो. तसेच संगीतप्रधान नाटकांनी स्वतंत्र मुद्रा उमटवली.
अण्णासाहेब किर्लोस्करांनी मराठी नाटय़सृष्टीत नवनवे प्रयोग करून नवा पायंडा पाडला. त्या काळी पौराणिक व ऐतिहासिक नाटकांची चलती होती. पण ज्या वेळी समस्येच्या कारणांचा शोध घेण्याची आवश्यकता नाटककारांना जाणवली त्या वेळी नाटय़सृष्टीने कूस बदलली. त्यानंतर गडकरी, वरेरकर, कानेटकर, तेंडुलकर असे नाटककार पुढे आले. रंगायन, छबिलदास अशा प्रयोगांतून नवी नाटके, नवे नाटककार इंटरनेटच्या युगातील प्रश्न मांडू लागले, असे त्यांनी नमूद केले. विषयाचा आवाका मोठा असूनही संध्या देशपांडे यांनी त्याचा विविधांगी परामर्ष घेतला.
प्रा. अनघा गोडसे-वैद्य यांनी डॉ. देशपांडे यांचा परिचय करून दिला. मुकुंद गोरे यांनी आभार मानले. अर्चना ताम्हणकर यांनी सूत्रसंचालन केले.