सातारा / प्रतिनिधी :
इच्छाशक्ती ज्यांची उदंड असते, ज्यांची स्वप्न मोठी असतात. ती माणसं ध्येय पुर्ण करण्यासाठी अपार कष्ट करतात. मेहनत घेत असतात. ध्येय पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या ध्येयवेड्यांना मार्ग निश्चित सापडतो. अशी ध्येयवेडी व्यक्ती साताऱ्यात गेल्या तीन वर्षापासून आपल्या नातेवाईकांसमवेत रहाते आहे. ती तृतीयपंथी असूनही तिला पोलीस व्हायच आहे. त्याकरिता मैदानावर साताऱ्याच्या मातीत सराव करत आहे. अभ्यास आणि मेहनत घेत आहे. एवढंच न करता ती राज्याच्या गृहमंत्र्यांकडेही पाठपुरावा करत आहे.
पोलीस व सैन्य दलामध्ये भरती होणं तेवढं सोपं नसतं. पोलीस दलात भरती होण्यासाठी अनेकजण मेहनत घेत असतात. अभ्यास करत असतात. साताऱ्यात गेल्या तीन वर्षापासून नातेवाईकांकडे राहून पोलीस भरतीचे स्वप्न पहाणाऱ्या सांगलीच्या तृतीय पंथी आर्या पुजारीची अशीच मेहनत डोळय़ात अंजन घालणारी आहे.
आर्याने 12 वी विज्ञानपर्यंतचे शिक्षण तीने शिक्षण पुर्ण केले आहे. साताऱ्यातल्या एका करिअर ऍकॅडमीत पोलीस भरतीचा सराव करते आहे. धावण्यांबरोबर अभ्यासामध्ये तीने लक्ष घातले आहे. तृतीय पंथींकडे आधारकार्ड, पॅनकार्ड अशी ओळखपत्र आहेत. मात्र तिच्यापुढे पेच निर्माण झाला आहे तो पोलीस भरतीचा अर्ज करताना अर्जात स्त्री, पुरुष असे दोनच पर्याय असल्याने आर्यावर पोलीस भरती होण्याकरिता अन्याय होत आहे, असे तीने स्वतः अर्ज विनंत्याद्वारे राज्य शासनाकडे कळवले आहे.
वास्तविक तृतीय पंथी म्हटलं की समाजाचा पहाण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. टाळी वाजवून रेल्वेत, बाजारात दुकानदारांना चार दोन पैसे मागुन त्यावर गुजराण करणे, किंवा सेक्स वर्क म्हणून काही तृतीयपंथी काम करतात. परंतु पोलिसात भरती होण्याचे स्वप्न पहाणाऱ्या आर्याची जिद्द पाहून अंचबित होत आहेत.









