ऑनलाईन टीम / पुणे :
कोविडच्या काळात तृतीयपंथींवर उपासमारीची वेळ आली असताना त्यांना मदतीचा हात देणे गरजेचे आहे. त्यासोबतच त्यांचे लसीकरण होणे देखील आवश्यक असून तृतीयपंथींकरीता स्वतंत्रपणे लसीकरण मोहिम राबविणार आहे. त्याकरीता नोंदणी व लसीकरण यंत्रणा उभारण्याचा निर्णय झाला असून लवकरच कार्यवाही करण्यात येईल, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टतर्फे ५० तृतीयपंथी व देवदासिंना धान्य किटची मदत देण्यात आली. यावेळी क्रिएटिव्ह चेनच्या कनन पटेल, सिनेदिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, डॉ.ज्ञानराज भुजबळ, अॅड.शिवराज कदम जहागिरदार, विश्वास भोर, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पवार, हनुमंत शिंदे, राजेंद्र देशमुख, आनंद सराफ, शिरीष मोहिते आदी उपस्थित होते. डॉ.ज्ञानराज भुजबळ यांनी धान्य किट उपक्रमाकरीता विशेष सहकार्य केले. लॉकडाऊन काळात बाहेरगावच्या विद्यार्थ्यांकरीता आधीपासूनच भोजनसेवा ट्रस्टतर्फे सुरु आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना भोजन वाटप देखील यावेळी महापौरांच्या हस्ते झाले.
मुरलीधर मोहोळ म्हणाले, पुण्याला गणेशोत्सव आणि गणेशोत्सव मंडळांची मोठी परंपरा आहे. लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या उत्सवाचा उद्देश मंडळे आणि कार्यकर्त्यांनी आजही जपला आहे. संकटाच्या काळात नेहमीच गणेशोत्सव मंडळे मदतीकरीता उभी राहिली आहेत. सेवा मित्र मंडळांनी देखील कोविडच्या काळात केलेले काम कौतुकास्पद आहे.
मंडळाचे अध्यक्ष रवींद्र बरिदे म्हणाले, तृतीयपंथींना मदत देण्यासोबतच कोविडच्या दुस-या लाटेतील लॉकडाऊनच्या सुरुवातीपासून विद्यार्थी भोजनसेवा सुरु केली. आजमितीस सुमारे १३५ विद्यार्थी नियमीतपणे दररोज भोजन घेऊन जात आहेत. ही संख्या वाढत असून मंडळातर्फे उत्तम भोजन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच समाजातील विविध गरजू घटकांना देखील मदत देणार असल्याचे त्यांनी सांगितले. मंडळाचे वैभव वाघ, अमर लांडे, विक्रांत मोहिते, कालिदास पंडित, सचिन ससाणे, उमेश कांबळे, देविदास चव्हाण, पराग शिंदे, राजेंद्र कांचन आदींनी आयोजनात सहभाग घेतला.








