निवडणूक आयोगाने तृणमूल काँग्रेसच्या वीरभूम जिल्हा अध्यक्ष अनुव्रत मंडल यांना मंगळवार संध्याकाळ 5 वाजल्यापासून शुक्रवार सकाळी 7 वाजेपर्यंत कठोर देखरेखीत ठेवले आहे.
मंडलच्या विरोधात अनेक तक्रारी मिळाल्या होत्या. याचमुळे त्यांना कठोर देखरेखीत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱयाने दिली आहे.
विविध स्रोतांकडून मिळालेला फीडबॅक आणि डीईओ तसेच पोलीस अधीक्षक, वीरभूमच्या अहवालानुसार आयोगाने स्वतंत्र तसेच निष्पक्ष निवडणूक सुनिश्चित करण्यासाठी मंडल यांना कार्यकारी न्यायदंडाधिकारी आणि सीएपीएफच्या कठोर देखरेखीत ठेवण्याचा निर्देश देण्यात आल्याचे अधिकाऱयाने म्हटले आहे.
या कालावधीत ‘तारीख आणि स्टँपसह’ चित्रिकरण करण्यात येणार आहे. वीरभूमध्ये विधानसभा निवडणुकीच्या अखेरच्या आणि आठव्या टप्प्यात गुरुवारी मतदान होणार आहे. मंडल यांना 2019 ची लोकसभा निवडणूक आणि 2016 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान देखील अशाचप्रकारे देखरेखीत ठेवण्यात आले होते.









