बलरामदादा श्रीकृष्णाला पुढे म्हणाले-कृष्णा! या प्रसंगी तुझी करणी विपरीत झाली. संपत्तीने मदांध झालेल्याला राज्यलोभाने काम क्रोध उपजतात. त्या लोभाने त्याची बुद्धी मंद होते व तो थोरांच्या विरुद्ध चुकीचे आचरण करतो. आपले राज्य गेले किंवा समोरच्याचे राज्य ताब्यात घ्यायचे असेल तर चित्तात स्वार्थाने मोठा क्रोध उत्पन्न होतो, असे कोणतेही कारण तुझ्या कृतीमागे नाही.
अथवा धनागमनागमनीं । प्रबळ लोभ उपजे मनीं।
वेदविक्रय किजे ब्राह्मणीं । धनालागी कलियुगी ।।
धनालागी वेदाध्ययन । धनालागी पुराणपठण ।
धनालागी व्याकरण । शास्त्रश्रवण वेदांत ।।
धनालागी घेती दान । धनालागी होती सज्ञान ।
धनालागी नीचसेवन । उपसर्पण हिनाचे ।।
धनालागी देह विकिती । धनालागी दांभिक भक्ती ।
धनकामना कर्मे करिती । नानावृत्ती धनेच्छा ।।
त्या धनास होय अवरोधू । तेव्हा सज्ञानियासी उपजे क्रोधू ।।
विवेकीही होय मंदू । प्रबळ विरोधू धनवंता ।।
आणीक एक थोर कारण । जेव्हा होय दाराहरण ।
न विचारिता आत्ममरण । वेंचिती प्राण स्त्रीलोभें ।।
अथवा होता मानहानी । विवेकी होय अभिमानी ।
निंदा द्वेष उपजे मनी । मानालागोनी सर्वथा ।।
का आंगीचेनि शौर्यतेजे । येरयेरां निंदिती राजे ।
वीर्यशौर्याचेनि मांजे । अतिउन्मत्त होऊनि ।।
अणुमात्र स्वार्थाचा अवरोधू । होता समस्ता उपजे क्रोधू । स्वार्थालागोनि विरोधू । पडे संबंधू द्वेषाचा ।।
इतुकी कारणे सर्वथा । तुज तव नाही गा कृष्णनाथा ।
रुक्मियाची विरुपता । कवण्या अर्था तुवा केली ।।
तू परिपूर्ण आत्माराम । तुज सर्वथा नाही काम ।
तरी का केले निंद्य कर्म । क्षत्रियधर्म हा नव्हे ।।
किंवा पैशाच्या प्रबळ लोभापोटी माणसे अविवेकाने वागत. कलियुगात ब्राह्मण धनाच्या लोभापोटी पवित्र अशा वेद ज्ञानाची विक्री करतात, धनासाठी वेदाध्ययन, धनासाठी पुराणपठण, धनासाठी व्याकरण, शास्त्र, वेद यांचे श्रवण, अध्ययन. धर्मासाठी दान घेतात, धन मिळविण्यासाठीच ज्ञान मिळवतात, धनासाठी काहीही सेवन करतात व नीचांच्या संगतीत राहतात, धनासाठी देहाची विक्री करतात, धनासाठी दांभिक भक्तीचे सोंग करतात, धनासाठी कोणतेही नीच कर्म करतात, धन मिळवण्यात अडथळा निर्माण झाला की विवेकी सज्ञान मनुष्यही मंद बुद्धीच्या मनुष्याप्रमाणे क्रोधी होतो, जेव्हा एखाद्याची प्रिय पत्नी मरण पावते त्यावेळी तो स्वतः प्राण सोडतो, एखाद्याची मानहानी त्याच्या मनात निंदा, द्वेष उपजतात, काही राजे शौर्याच्या अहंकाराने, माजाने दुसऱयांची निंदा करतात. आपल्या स्वार्थाला अणुमात्र, किंचित असा अडथळा निर्माण झाला तर तेथे क्रोध व द्वेष हे निर्माण होत असतात. पण कृष्णा! ही कोणतीच कारणे तुझ्या बाबतीत संभवत नाहीत. मग रुक्मीची विरुपता तू का केलीस? कृष्णा! तू केवळ परिपूर्ण असा आत्माराम आहेस. तुला कोणतीही कामना नाही तरी तू हे निंद्य कर्म का केलेस?
Ad. देवदत्त परुळेकर