भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीची चेष्टा करीत तिला पुढे म्हणाले-
ज्यांचा आचार न कळे प्रकट। लौकिकरहित ज्यांची वाट । त्यांच्या मार्गा झालिया विनट । पावती कष्ट कुलस्त्रिया। लौकिकरहित पद्धति कैसी। तेही कथितों तूं परियेसीं । सूचनामात्रे सर्वज्ञांसी । नुमजे मूर्खासी बहु कथितां। लोक सकिंचनास्पदीभूत। आम्ही निष्किंचन संतत। निष्किंचन जन जे आम्हां भजत । आम्ही बहुत प्रियतम त्यां । तस्मात् आम्ही आढय़ न हों । आढय़ां आम्हां न घडे स्नेहो । यालागीं असाम्य सुहृद्भावो । रायां आम्हां नृपतनये । जीच्या मध्यासी सिंह उपमा । तियेसि म्हणिजे सुमध्यमा। म्हणोनि संबोधी परमात्मा । सुमध्यमें या संबोधनें । म्हणसी समता कोणेपरी। शास्त्रनिर्दिष्टग्रंथान्तरिं। तेंही कथिजेल तूं अवधारिं । अभ्यंतरिं विवरूनी।
हे सुंदरी! आमचा मार्ग कोणता, हे सुद्धा लोकांना माहीत नाही. लौकिक व्यवहार सोडून वागणारे आम्ही! तसेच स्त्रियांना खूषही न करणाऱया पुरुषांना वरणाऱया स्त्रियांना बहुदा दु:खच भोगावे लागते. हे सुंदरी! आम्ही असे जवळ काही न बाळगणारे! आणि जे जवळ काहीं बाळगत नाहीत अशाच लोकांवर आम्ही प्रेम करतो. यामुळेच धनवान लोक बहुदा आमच्या वाऱयालाही रहात नाहीत.
परस्परें समान वित्त । समान ज्यांचें श्रुताधीत ।
जन्म कर्म वय समस्त । समान वृत्त जयांचें ।
वृत्ति व्यवहार कुळाचार । ऐश्वर्य आकृति संसार ।
गोत्रनिर्णय परात्पर । सुहृदाचार सम उभयां ।
ऐशियांमाजी परस्परें । विवाह मैत्री परमादरें ।
चाले आणि स्नेहसुभरें । परस्परें उपकरती ।
अधमोत्तमांमाजि मैत्री । कोठें न घदे वो राजपुत्री ।
घडल्या अनादर उभयत्रीं । वैराधारिं प्रवर्तती ।
ज्यांच्या धन, कूळ, ऐश्वर्य, सौंदर्य आणि प्रताप या गोष्टी सारख्या असतात, त्यांचेच परस्पर विवाह आणि मैत्री होतात. श्रे÷-कनि÷ांचे नव्हेत.
अवो वैदर्भिये चतुरे । तुवां नेणोनि या प्रकारें । आदि पश्चात् शास्त्राधारें । दीर्घ विचारें न शोधितां। गुणविहीनां वरिलें आम्हां । भिक्षुकांचिये वचनीं प्रेमा। धरूनि भुललीस निष्कामकामा । राजसत्तमां सांडूनी।त्यांचा उगाचि हा आग्रह । माझ्या ठायीं धरूनि स्नेह । कीर्तनमिसें परमोत्साह । करिती निःस्पृह सर्वत्र । विरक्त निःस्पृह परमहंस । सदैव ऐक्मय आम्हां त्यांस । ते मज स्तविती त्या वचनास । भाळलीस नृपतनये। तिहीं श्लाघ्य केलों स्तवनें । तूं भुललीसी तयांच्या वचनें । आम्हां गुणहीनांकारणें । वरिलें विचार न करूनी ।
हे विदर्भराजकुमारी! दूरदर्शीपणा नसल्यामुळे तू या गोष्टींचा विचार केला नाहीस आणि भिक्षुकांकडून माझी खोटी प्रशंसा ऐकून माझ्यासारख्या गुणहीनाला तू वरलेस. अगं, त्यांनी उगीच आग्रह धरला. त्यांना माझ्याविषयी विशेष प्रेम असल्याने ते माझे गुणसंकीर्तन उगीचच करीत असतात. जे विरक्त, निस्पृह परमहंस महात्मे आहेत ते माझ्याशी एकरूपच झालेले आहेत. ते माझी स्तुती करतच असतात आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून तू भुललीस.
Ad. देवदत्त परुळेकर