प्रतिनिधी/ मंडणगड
राष्ट्रीय महामार्गावर तुळशी-पाले दरम्यानच्या जुन्या रस्त्याची दुर्दशा झाली असून त्याची दुरूस्ती लवकरात-लवकर करावी, अन्यथा तुळशी ग्रामस्थांच्यावतीने उपोषणास बसण्याचा इशारा तुळशीच्या सरपंच अनुष्का पिचुर्ले यांनी तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिला आहे.
या निवेदनात पुढे म्हटले आहे की, राजेवाडी ते आंबडवे या राष्ट्रीय महामार्गाचे ठेकेदार व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यांनी वेळोवळी सूचना व विनंती करुनही रस्त्याची डागडुजी अद्याप करण्यात आलेली नाही. यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान होत असून आजारी व वयोवृध्द नागरिकांना तसेच गर्भवती स्त्रियांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या महिनाभरात सुमारे 15 दुचाकीस्वारांचे तसेच 3 स्थानिक रिक्षा चालकांचे रस्त्यातील खड्डय़ांमुळे अपघात होऊन वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय नागरिक व वाहनचालकांना दुखापती झाल्या आहेत. याला प्रशासन व ठेकेदारच जबाबदार असून पावसाळ्यापूर्वी या रस्त्यांची डागडुजी करण्याच्या दिलेल्या आश्वासनाची पूर्तता अद्याप झालेली नाही. त्यामुळे संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.









