राज्यात तुळशी विवाहाला आजपासून प्रारंभ
प्रतिनिधी / पणजी
कार्तिकी एकादशी बरोबरच आजपासून राज्यात तुळशीविवाह सोहळय़ाला प्रारंभ होत आहे. कार्तिक पौणिमेपर्यंत चालणाऱया या सोहळ्याच्या तयारीनिमित्त राज्यातील बाजारपेठांमध्ये ऊस, चिंचा, आवळे, पोहे, बताशा व इतर अनेक सामानाच्या खरेदीसाठी काल बुधवारी ग्राहकांनी एकच गर्दी केलेली दृष्टीस पडली.
आजपासून तुळशीविवाह सोहळ्याला प्रारंभ होत आहे. पुढील चार दिवस सवडीनुसार भक्तमंडळी आपापल्या घरी असलेल्या तुळशीवृंदावनाला नवरी बनवून हा विवाहसोहळा साजरा करणार आहेत. तुळशीमध्ये लावण्यात येणारे ऊस, चिंचा, आवळे, जीना इत्यादींची विक्रीही मोठय़ा प्रमाणात सुरु होती. चुरमुरे विक्रीसाठी उदंड प्रतिसाद मिळल्याचे चित्र दिसून येत होते. आज सकाळपासूनच घरोघरी तुळशीविवाह सोहळय़ाची लगबग दिसून येईल.
त्रिपुरारी पौणिमा सोमवारी
त्रिपुरारी पौणिमा सोमवारी 30 नोव्हे. रोजी आहे. या दिवशी गावातील नदीमध्ये दीपदान करून दिवाळी उत्सवाची सांगता होईल. आज कार्तिकी एकादशीचा मुख्य सोहळा विठ्ठलापूर सांखळी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात होणार आहे. देवस्थाचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे तसेच देवस्थान समितीचे काही पदाधिकारी श्री विठ्ठल रखुमाईवर अभिषेक करतील. जनतेला अभिषेक करायला दिला जाणार नाही. राज्यातील म्हापसा, फोंडा, रायबंदर, पणजी, ताळगाव, कुंभारजुवे, सांगे आदी ठिकाणी असलेल्या श्री विठ्ठल मंदिरात आज विशेष धार्मिक सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
आज सायंकाळी राज्यातील बहुतांश भागात तुळशीविवाह होईल. या सोहळ्यानंतर आता राज्यात विवाह सोहळ्यांना खऱया अर्थाने मुहूर्त भेटतील. कोरोना संक्रमणामुळे त्रस्त असलेल्या जनतेला यंदा आटोपशीर विवाह सोहळे करावे लागणार आहेत. जास्त गर्दी करणारे सोहळे जवळपास रद्द होण्याच्या मार्गावर आहेत. गोमंतकीय रितीरिवाजानुसार तुळशीविवाहनंतरच लोकांच्या विवाह सोहळ्यांना प्रारंभ होतो.









