ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
चीनमधील कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे भारतीयांनी तुर्तास चीनमध्ये जाणे टाळावे, अशा सूचना केंद्र सरकारकडून देण्यात आल्या आहेत.
आज झालेल्या कॅबिनेट सचिवांच्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. चीनमध्ये सध्या कोरोना विषाणूने थैमान घातला असून, या विषाणूमुळे चीनमध्ये आतापर्यंत 361 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 14 हजार 562 जणांना याची लागण झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर आज झालेल्या कॅबिनेट सचिवांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला आरोग्य कल्याण खात्यातील, परराष्ट्र खात्यातील आणि आरोग्य संशोधन खात्यातील सचिवांसोबतच इतर खात्याचे प्रतिनिधी उपस्थित होते.
चीनमधून भारतात आलेल्या 445 फ्लाईट्समधून जवळपास 58 हजार 658 प्रवाशांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 142 संशयित प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची तपासणी सुरू असून केरळमधील 2 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.









