इस्रायलकडूनही सक्त ताकीद : तुर्कस्तानने अनेक देशांना दुखावले
वृत्तसंस्था / रियाध
सौदी अरेबियाने स्वतःच्या नागरिकांना तुर्कस्तानवर बहिष्कार टाकण्यास सांगितले आहे. तुर्कस्तानशी असलेले संबंध आणि तेथील उत्पादनांचा वापर संपुष्टात आणण्यास सांगण्यात आले आहे. तुर्कस्तानच्या कृत्यांवर अंकुश आणा, अन्यथा आपण अन्य पर्यायांचा विचार करू, असे इस्रायलने नाटोला बजावले आहे. रेसेप तैयब एर्दोगान यांच्या नेतृत्त्वाखालील मुक्त तसेच आर्थिकदृष्टय़ा बहरात असलेला तुर्कस्तान आता धार्मिक कट्टरतेच्या दिशेने वाटचाल करू लागला आहे. एर्दोगान यांनी मुस्लीम जगताचे नेतृत्त्व मिळविण्याच्या नादात अनेक देशांना दुखावले असून यात भारताचाही समावेश आहे.
तुर्कस्तानच्या सामुग्रीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन सौदी अरेबियाच्या चेम्बर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अजलान अल अजलान यांनी केले आहे. हा बहिष्कार तुर्कस्तानातील उत्पादनांची आयात, गुंतवणूक व पर्यटनावरही असणार आहे. यात देशाच्या उद्योजक व ग्राहकांना भागीदारी पार पाडावी लागणार आहे. हा निर्णय तुर्कस्तानच्या सरकारकडून सौदी अरेबिया व सौदी नेतृत्त्वाला कमी लेखणारी विधाने व कृत्यांमुळे घेतल्याचे सांगण्यात आले.
क्षेत्राला अस्थिर करण्याचा आरोप तुर्कस्तानचे अध्यक्ष एर्दोगान यांनी अलिकडेच अरब देशांवर केला होता. संयुक्त अरब अमिरात आणि बहारिनकडून इस्रायलसोबत कूटनीतिक संबंध प्रस्थापित केल्याने एर्दोगान यांनी निंदा केली होती. अरब देश मध्यपूर्व क्षेत्राला अस्थिर करत आहेत. तुर्कस्तानचा ध्वज पूर्ण भागात पुन्हा फडकविण्याचे प्रयत्न सुरूच ठेवल्याचे एर्दोगान यांनी भर संसदेत म्हटले होते.
इस्रायलही संतप्त
इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गेंट्ज यांनी शांतता प्रयत्नांच्या विरोधात तुर्कस्तानच्या कारवायांवर नाराजी व्यक्त केली आहे. तुर्कस्तान आणि इराण शांततेला चालना देण्यास तयार नाहीत. क्षेत्रात अराजकतेची स्थिती निर्माण करू पाहत आहेत. तुर्कस्तानचा सीरिया, लीबिया आणि भूमध्य समुद्र क्षेत्रातील हस्तक्षेप शांततापूर्ण स्थिती बिघडवत असल्याचे गेंट्ज म्हणाले.









