वृत्तसंस्था / इस्लामाबाद
आर्मेनियाच्या विरोधातील भीषण युद्धात अझरबैजानला साथ देणाऱया पाकिस्तानची नजर आता तुर्कस्तानच्या घातक ड्रोनवर (बैयराक्तार टीबी-2) केंद्रीत झाली आहे. याच किलर ड्रोनने नागर्नो-कराबाखमध्ये विध्वंस घडवून आणला होता. या युद्धात तुर्कस्तान आणि पाकिस्तानने अजरबैजानला मदत पुरविली होती. पाकिस्तान आता काश्मीर आणि अफगाणिस्तानच्या मुद्दय़ावर तुर्कस्तानसाब्sात द्विपक्षीय संबंध मजबूत करू इच्छितो.
बैयराक्तार टीबी-2 हा ड्रोन तुर्कस्तानकडून मिळविण्याचा प्रयत्न पाकिस्तानने चालविला आहे. याचबरोबर तुर्कस्तान आणि पाकिस्तान संयुक्त संरक्षण प्रकल्प, अफगाणिस्तानसंबंधी सहकार्यावर चर्चा करत आहेत. सध्या तुर्कस्तानचे सैन्यप्रमुख पाकिस्तानच्या दौऱयावर आहेत.
तुर्कस्तानसोबत संरक्षण संबंध बळकट करण्यासाठी पाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी तुर्कस्तानच्या सैन्यप्रमुखांना ‘निशान-ए-इम्तियाज’ने गौरविले आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात तुर्कस्तानने देखील पाकिस्तानचे जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ जनरल नदीम राजा यांना गौरविले होते. तुर्कस्तानच्या सैन्यप्रमुखांनी पाकिस्तानचे सैन्यप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांची भेट घेतली होती.
सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातसोबतचे पाकिस्तानचे संरक्षण संबंध बिघडले आहेत. तुर्कस्तानला पश्चिम आशियात स्वतःचे प्रभुत्व निर्माण करू पाहत आहे. तुर्कस्तानच्या या भूमिकेला अर्थातच सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातचा विरोध आहे. याचमुळे पाकिस्तान तुर्कस्तानशी जवळीक साधत आहे.
ड्रोन देण्यासाठी दबाव
पाकिस्तान सातत्याने तुर्कस्तानवर लढाऊ ड्रोन देण्यासाठी दबाव आणत आहे, पण तुर्कस्तानने अद्याप याला मंजुरी दिलेली नाही. सध्या दोन्ही देशांचे लक्ष अफगाणिस्तानवर केंद्रीत आहे. तुर्कस्तान देखील अफगाणिस्तानातील स्वतःचा प्रभाव वाढवू पाहत आहे.









