वृत्तसंस्था/ पॅरिस
तुर्कस्तानच्या बहिष्काराच्या आवाहनानंतरही फ्रान्सने शिक्षक सॅम्युअल पॅटी यांच्या हत्येनंतर इस्लामिक कट्टरवाद्यांच्या विरोधातील धडक कारवाई सुरूच ठेवली आहे. फ्रान्सने राजधानी पॅरिसच्या उत्तर-पूर्व भागातील कट्टरवाद्यांना लक्ष्य वेपे आहे. प्रेंच अधिकाऱयांनी ‘इस्लामिक आंदोलनात’ सामील असल्याच्या आरोपाखाली मशीद बंद करविली आहे.
मशिदीशी संबंधित लोकांनी शिक्षकाला लक्ष्य करत चित्रफिती समाजमाध्यमांवर प्रसारित केल्याचा आरोप आहे. शिक्षकाच्या हत्येप्रकरणी मोठय़ा संख्येत लोकांची चौकशी केली जात असून भविष्यातील कारवाईसाठी योजना आखली जात आहे. दोषींच्या विरोधात कठोर कारवाई करणार असल्याचे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी स्पष्ट केले आहे.
120 ठिकाणी छापे
आतापर्यंतच्या कारवाईत 120 ठिकाणी छापे टाकण्यासह कट्टरवादी विचारसरणी फैलावण्याचा आरोप असलेल्या संघटनांची चौकशी करण्यात आली आहे. याचबरोबर दहशतवाद्यांना मिळणारा पैसा रोखण्यासाठी व्यापक योजना तयार करण्यात आली आहे. फ्रान्समध्ये अशाप्रकारची कठोर कारवाई मॅक्रॉन यांच्या कार्यकाळात कुठल्याच दहशतवादी हल्ल्यानंतर झाली नव्हती असे जाणकार सांगत आहेत.
शिक्षकांचे स्वतःवर सेन्सॉर
फ्रान्सच्या एक तृतीयांश शिक्षकांनी स्वतःला सेन्सॉर करत धर्मनिरपेक्षतेच्या वादापासून वाचण्याचे पाऊल उचलल्याचे एका सर्वेक्षणात दिसून आले आहे. शिक्षकांनी आता बचावात्मक भूमिका घेतल्याचे आढळून येत आहे. तर फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांच्या इस्लामिक दहशतवादाच्या निंदेचे परिणामही समोर येत आहेत. अरब जगतासह मुस्लीम देशांमध्ये प्रेंच उत्पादनांवर बहिष्काराची मागणी जोर धरू लागली आहे. कुवेत, जॉर्डन आणि कतारमध्ये अनेक दुकानांमधून प्रेंच उत्पादने हटविण्यात आली आहेत. तर आशियात पाकिस्तान आणि बांगलादेशमध्येही फ्रान्सच्या विरोधात निदर्शने झाली आहेत.









