ग्रा. पं. अध्यक्षांच्या पतीची अरेरावीची भाषा : महिलांकडून तीव्र निषेध : रोहयो कामे वेळेत देत नसल्याचा आरोप
वार्ताहर / उचगाव
तुरमुरी ग्रा. पं. कार्यक्षेत्रातील तुरमुरी गावातील रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणाऱया महिलांना ग्रा. पं.कडून वेळेत रोजगाराची कामे दिली जात नाहीत. रोज रोजगार मिळावा या मागणीसाठी ग्रा. पं.मध्ये गेलेल्या महिलांना ग्रा. पं. अध्यक्षांच्या पतीने अरेरावीची भाषा वापरल्याच्या निषेधार्थ येथील संतप्त महिलांनी ग्राम पंचायतवर मोर्चा काढून टाळे ठोकले.
तुरमुरी ग्राम पंचायतीतर्फे जवळपास 280 महिलांना जॉबकार्ड दिली आहेत. ग्रा. पं. च्या कार्यक्षेत्रात विकासकामे राबविण्यासाठी कामे भरपूर आहेत. मात्र ग्रा. पं. जाणूनबुजून ती कामे देत नसल्याची तक्रार या रोजगार हमी योजनेतील महिलावर्गाकडून करण्यात येत होती. तसेच काम करताना शासकीय अधिकारी तसेच सदस्य कामावर केव्हाही येऊन पाहणी करत नसल्याच्या तक्रारी महिलांनी केल्या. याबरोबरच दिवसाकाठी एका महिलेला 287 रुपये मजुरी आहे, मात्र प्रत्यक्षात काही महिलांना 190 रुपये दिले जातात. याची संबंधित अधिकारीवर्गाने तातडीने दखल घेऊन आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात येत होती. रोहयोतील काम करणाऱया महिलांच्या पतींना अध्यक्षांच्या पतीकडून दबाव आणत असल्याच्या तक्रारी महिला करत होत्या. यामध्ये रेश्मा तंगाणकर, सुरेखा कलंभट, वनिता बांडगे, लक्ष्मी चलवेटकर, कविता जाधव, सरस्वती तुप्पट, चंदना कलंभट, जयश्री बेळगुंदकर, माया तंगाणकर, पार्वती खांडेकर, लक्ष्मी खांडेकर, माधुरी मोनाप्पा बेळगुंदकर, विद्या बाळू डोंबले, वंदना इराप्पा खांडेकर, आरती यल्लाप्पा बांडगे, माया मारुती बेळगुंदकर या महिलांसह दोनशे महिला यावेळी उपस्थित होत्या.
अध्यक्षांकडून माफी
ग्रा. पं. अध्यक्षा वैशाली खांडेकर यांनी रोजगार हमी योजनेतील महिलांशी उद्धट बोलल्याने रोहयोतील महिला दुखावल्या गेल्या होत्या. अखेर वैशाली खांडेकर यांनी या महिलांची माफी मागितली. त्यानंतर ग्रा. पं. कार्यालयाचे टाळे खोलण्यात आले.
रोजगार देण्याचा प्रयत्न
‘तरुण भारत’ प्रतिनिधीशी बोलताना ग्रा. पं. अध्यक्षा वैशाली खांडेकर म्हणाल्या, मी अध्यक्षपदावर येऊन अवघा दीड महिना होत आहे. गावातील रोजगार मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन. ग्रा. पं. विकास अधिकारी यांच्याशी चर्चा करून अधिकाधिक काम उपलब्ध करून देऊ.
– वैशाली खांडेकर, ग्रा. पं. अध्यक्षा
मंजुरी मिळताच काम
रोहयोंतर्गत तुरमुरी ग्रा. पं. कार्यक्षेत्रातील भागात रोजगाराच्या कामांच्या माहितीचे परिपत्रक शासनाकडे मंजुरीसाठी दिले आहे. मंजूर होऊन येताच काम देण्यात येईल.
– सेपेटरी एन. ए. सुतार