गोवा फॉरवर्ड नेते विजय सरदेसाई यांचा इशारा
प्रतिनिधी /पणजी
कोविडमध्ये लॉकडाऊन असताना 408 मॅट्रिक टन तुरडाळ खरेदी करुन ती जनतेला वितरित न करता कुजवून टाकलेली आहे. ही डाळ खरेदीची प्रक्रिया मंत्रिमंडळातील निर्णयाद्वारे झाली होती. त्याचा पुरावा गोवा फॉरवर्ड नेते विजय सरदेसाई यांनी पत्रकारांसमोर सादर केला असून याप्रकरणी आपण पंतप्रधानांकडे तक्रार करणार असल्याचा इशारा दिला आहे.
राज्यातील गोरगरीब जनतेला वितरित करण्याऐवजी 408 मॅट्रिक टन तुरडाळ कुजवून टाकण्यात आली परंतु, ती वितरित केलेली नाही. ‘नाफेड’कडून 408 मॅट्रिक टन तुरडाळ 79 हजार रु. प्रति मॅट्रिक टनने खरेदी करायची आणि रेशनकार्ड धारकाला 83 रु. प्रति किलो या दराने कोणताही फायदा न घेता सर्व खर्चासहीत द्यायची, या संदर्भातील मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव नागरी पुरवठा सचिव ईशा खोसला यांनी 22 एप्रिल 2020 च्या बैठकीसमोर ठेवला होता. तो संमतही झाला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि नागरी पुरवठामंत्री गोविंद गावडे यांच्या संमतीनेच ही डाळ खरेदी करण्यात आली होती, असे विजय सरदेसाई यांनी म्हटले आहे. त्याकाळी तुरडाळ खुल्या बाजारात 200 रु. किलो होती.
सरकारी अधिकाऱयाला बळीचा बकरा बनवू नका
अंत्योदयाची भाषा करणाऱया राजकीय नेत्यांनी एवढय़ा मोठय़ा प्रमाणात डाळ खरेदी करुन ती कुजविली व बारिक छोटय़ा छोटय़ा नागरिकांची फसवणूक केलीय. कला अकादमीचा प्रकल्प उभारताना कोणतीही निविदा न काढता थेट कंत्राट देण्याचा रु. 50 कोटींचा घोटाळा केलेला आहे. तसेच हा डाळीचा घोटाळा करुन नंतर मंत्रिमंडळ बैठकीत आणला, असा थेट आरोप विजय सरदेसाई यांनी केला. आता या प्रकरणी सरकारी अधिकाऱयाला बळीचा बकरा न बनविता याची जबाबदारी स्वीकारा तसेच हे प्रकरण एसआयटीकडे सोपवा. आपण आता गप्प बसणार नाही. या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार असल्याचे विजय सरदेसाई यांनी म्हटले आहे.
नागरी पुरवठा खात्यात गोंधळ
7 वर्षांत पर्यवेक्षकांच्या बदल्या नाहीत नागरी पुरवठा खात्यात बराच गोंधळ असून उपलब्ध माहितीनुसार, प्रत्येक तालुक्यातील गोदामावर एकेका पर्यवेक्षकाची नियुक्ती केलेली आहे. दर 3 वर्षानंतर त्यांची बदली करायची असते. खुद्द संचालकांच्या देखील बदल्या झालेल्या आहेत परंतु, पर्यवेक्षकांच्या बदल्या गेल्या 7 वर्षात झालेल्या नाहीत. याचे नेमके कारण समजत नाही. नागरी पुरवठा खात्यात या विषयावर खमंगपणे चर्चा सुरु आहे. ‘इस डाल मे कुछ काला है!’ असे खात्यातील इतर कर्मचाऱयांमध्ये बोलले जात आहे.









