प्रतिनिधी /पेडणे
पेडणे तालुक्मयातील तुये गांवची ग्रामदैवत श्री देवी भगवती पंचायतन संस्थानचा वार्षिक जत्रौत्सव बुधवार 8 डिसेंबर रोजी साजरा होणार आहे. तत्पूर्वी मंगळवार 7 डिसेंबर रोजी श्रींचा पालखी उत्सव होणार असून देवस्थान समितीकडून या सर्वांत मोठय़ा उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे.
तुयेचा पालखी उत्सव हे खास आकर्षण आहे. जत्रौत्सवाच्या पूर्वसंध्येला पालखीतून श्रींची मिरवणूक संपूर्ण गावातून काढली जाते. वाडय़ावाडय़ावर रांगोळी आणि दीव्यांची आरास तयार करून श्रींचे स्वागत केले जाते. विशेष बँण्डबाजाने काढण्यात येणाऱया या मिरवणूकीत ठिकठिकाणी वाडय़ावाडय़ावर सुहासिनींकडून खणा- नारळाची ओटी भरली जाते. ही मिरवणूक संपून पहाटे ही पालखी मंदिरात दाखल होते.
दुसऱयादिवशी पहाटेपासूनच मंदिरात जत्रोत्सवानिमित्त धार्मिक विधी सुरू असतात. रात्री मध्यरात्रीच्या सुमारास पुन्हा मंदिराच्या सभोवताली पालखी मिरवणूक काढून त्यानंतर पावणी होते आणि तदंनंतर दशावतारी नाटय़प्रयोगाचे आयोजन केले जाते.
मंदिर सुशोभीकरणाची पायाभरणी गोवा पर्यटन विकास महामंडळातर्फे मंगळवार 7 डिसेंबर रोजी श्री देवी भगवती पंचायतन मंदिर सुशोभीकरण प्रकल्पाची पायाभरणी होणार आहे. तुयेचे सरपंच तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष सुहास नाईक यांनी ही माहिती दिली. या मंदिर सुशोभीकरणाअंतर्गत वेगवेगळी कामे हाती घेण्यात येणार असून तुयेचे मंदिर हे खास आकर्षण ठरणार असल्याचेही ते म्हणाले. मांदेचे आमदार तथा पर्यटन विकास महामंडळाचे चेअरमन दयानंद सोपटे यांच्या खास प्रयत्नांतून हा प्रकल्प उभारला जात असल्याची माहिती त्यांनी दिली. या पायाभरणी कार्यक्रमाला मोठय़ा प्रमाणात लोकांनी सहभागी व्हावे तसेच जत्रोत्सवात सहभागी होऊन श्रींचे दर्शन आणि आशिर्वाद घ्यावेत,असे आवाहन सुहास नाईक यांनी केले आहे.









