राज्यपालांकडून महाविकासआघाडीच्या अधिकारात वारंवार हस्तक्षेप
ऑनलाईन टीम / मुंबई
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यात दोन सत्ता केंद्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. हे योग्य नाही, असे मत व्यक्त करत अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच कोश्यारी यांना ते राज्यपाल असल्याचा विसर पडला की काय ? असे मत व्यक्त करत तुम्ही मुख्यमंत्री नाही, असा खोचक टोला देखील लगावला.
राज्य मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक पार पडल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक बोलत होते. मलिक यांनी राज्यपालांचा विषय आजच्या कॅबिनेटच्या बैठकित चर्चेला गेला. यात कॅबिनेटने नाराजी व्यक्त केली आहे. राज्यशासनाचे नियोजित कार्यक्रम हे सरकारचे अधिकार आहेत. याबद्दल तुम्ही दुसरं सत्ता केंद्र असल्याप्रमाणे वागत आहात. ते योग्य नाही. कोरोना काळात ही राज्यपाल कोरोना स्थितीचा आढावा घेत होते. यावर केंद्रात तक्रार झाल्यावर ते काही काळ थांबले. आणि पुन्हा त्यांनी हा कार्यक्रम सुरु ठेवला आहे.
याबाबत राज्य सरकारने नाराजी व्यक्त केली. आणि कॅबिनेटने ही याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. आम्हाला अपेक्षा आहे की जी चूक झालेली आहे, माहिती देण्यात आल्यानंतर ते सुधारतील. असंही नवाब मलिक यांनी यावेळी स्पष्ट केले.