ऑनलाईन टीम/तरुण भारत
मणिपूरमध्ये शनिवारी सकाळी आसाम रायफल्सच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात आसाम रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर कर्नल विप्लव त्रिपाठी आणि चार जवान शहीद झाले. या हल्ल्यात कर्नल त्रिपाठी यांची पत्नी आणि सहा वर्षांच्या मुलाचाही मृत्यू झाला. या घटनेवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. पंतप्रधान मोदी या देशाचे रक्षण करण्यास असमर्थ असल्याचं या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध झालंय, असं राहुल गांधी यांनी म्हटलंय. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केल्या.
राहुल गांधी यांनी “मणिपूरमध्ये लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने मोदी सरकार देशाचे रक्षण करण्यास असमर्थ असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. शहीद जवानांप्रती आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना. देश तुमचे बलिदान लक्षात ठेवेल,” असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.