महामुनी शुकदेव परिक्षिती राजाला कृष्ण कथा सांगताना पुढे म्हणतात-
गगनवाणी सर्वां कर्णीं । पडली असतां रुक्मी न गणी । पुढें वर्तली जैसी करणी । ऐकें श्रवणीं ते राया । अनादरूनि नभोक्तीला । रुक्मी दुर्मदें मत्त झाला । दुष्ट रायांहीं प्रेरिला । संकर्षणा उपहासी ।
पातली अंतकाळाची घडी । काळें बुद्धि प्रेरिली कुडी । रामा हांसोनि दांत काढी । म्हणे वांकुडि नभोवाणी । हेलना करूनि संकर्षणा । बोले दुरुक्ति उपहासवचना । कालिङ्गप्रमुखां भूपाळगणा । माजी वल्गना करीतसे । तिया वल्गना ऐक राया । स्वमुखें वदोनि पावला क्षया । त्या तुज कथितों सह श्रोतयां । विवरिं हृदयामाजिवडय़ा । तुम्ही गोपाळ गोरक्षक । गिरिकाननें परीक्षक ।
अक्षविद्येचें कौतुक । तुम्हां नावेक दूरतर ।
गाईरक्षणें विचरां वनीं । फळमूळांची घेइजे धणी ।
राजमंडळीं द्यूतक्रीडनीं । तुम्हांलागूनी अयोग्यता ।
यवस तरुवर दारुशकलें । गोमय फळ मूळें वल्कलें ।
यांवीण तुम्हां परीक्षा न कळे । तुम्ही गोवळे गिरिगामी । निर्यास लाक्षा शिंकीं दोर । मधुमक्षिकासंभव क्षौद्र । इत्यादि आजन्मकृत व्यापार । अक्षचतुर नव्हां तुम्ही । अक्षक्रीडा खेळती राजे । अनर्घ्य पदार्थ मांडूनि पैजे । कीं लक्ष भेदूनि दाविती ओजें । बाणसंधानें धनुर्विद्या ।
समराङ्गणीं द्यूतपणीं । भूप मिरवती चातुर्यखाणी ।
तुम्हांऐसिया गोरक्षगणीं । गिरिकाननीं मिरवावें ।
हमामा हुंबरी तुमचा खेळ । तुम्हां अनोळख नृपमंडळ। यालागीं नव्हां अक्षकुशळ । रक्षिजे केवळ अजा अविकां । द्यूत खेळिजे नृपगणीं आम्हीं । अजा अविकें रक्षिजे तुम्हीं । वृथा वाहतां ऐश्वर्यऊर्मी । परि क्षात्रधर्मीं योग्य नव्हां ।
यावेळी रुक्मीचा मृत्यु जवळ आला होता. त्यामुळे त्याच्या साथीदार दुष्ट राजांनी त्याला भडकावले. तेव्हा त्याने आकाशवाणीकडे लक्ष न देता बलरामाची खिल्ली उडवीत म्हटले, ‘तुम्ही वनात भटकणारे गवळी ! द्यूतातले तुम्हाला काय कळणार? फाशांनी आणि बाणांनी फक्त राजे लोकांनीच खेळावे. तुम्ही नव्हे!’
एवं द्यूतक्रीडामिसें । बळरामातें विदर्भाधीशें ।
नि÷gर निर्भर्त्सितां उपहासें । क्षोभला रोषें तें ऐका ।
विदर्भें ऐसा संकर्षण । गोरक्षदोषें हिणावून ।
गोरक्षचर्या परम न्यून । आंगीं लावून निखंदिला ।
आणि उपहासें सभास्थानीं। कालिङ्गादि भूपाळगणीं ।
हेलना करितां संकर्षणीं । काळकोपाग्नी प्रज्वळला ।
जैं सृष्टीचा प्रळयकाळ । तैं रुद्राचा नेत्रनळ ।
प्रकटूनि जाळी ब्रह्माण्डगोळ । त्याहून प्रबळ बळराम।
नेत्र आरक्त खदिराङ्गार । ऊर्ध्व दशनीं रगडूनि अधर । परिघ पडताळूनि सत्वर । केला प्रहार रुक्मीतें । आम्हां गोरक्षकांची क्रीडा । पणेंसहित घेईं मूढा । म्हणोनि परिघप्रहार गाढा । माथां रोकडा ओपियला। सभास्थानीं परिघघातीं । विदर्भभूप पाडिला क्षिती । मुखामघ्यें भरली माती। भडके वाहती रुधिराचे । हाहाकार सभास्थानीं। कालिङ्गप्रमुखां झाली पळणी । एकीं धरिलीं तृणें दशनीं । कितिएक धरणी प्रेतवत् । राया कुरुकुळगगनचंद्रा । आवेश न धरे बळसमुद्रा ।
ऐकें तयाची प्रतापमुद्रा । प्रळयरुद्रापडिपाडें ।
Ad. देवदत्त परुळेकर








