मुंबई/प्रतिनिधी
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणांवरून मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय. केंद्रीय तपास यंत्रणांमुळे “आम्ही जो त्रास भोगलाय त्या प्रत्येक सेकंदाची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल. नियती कुणालाही माफ करत नाही,” असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. या देशाची जनता कधीच कुणाला माफ करत नाही हे इंदिरा गांधी यांच्या काळातही पाहायला मिळालंय, असंही राऊतांनी यावेळी नमूद केलं.
संजय राऊत म्हणाले, “शरद पवार जे बोलत आहेत तो त्यांचा संताप, चीड आणि वेदना आहे. आमच्या मनात एक राग आहे. आम्ही महाराष्ट्रात महाविकासआघाडीचं सरकार बनवलं ते याच चिडीतून निर्माण झालेलं आहे. सत्तेसाठी काहीही करायचं, केंद्रीय तपास संस्थांचा अमर्याद गैरवापर करायचा, महाराष्ट्रात केंद्रीय संस्थांचा दुरुपयोग लोकशाही संकेतांना धरून नाही. शरद पवार यांनी सांगितलंय की तुम्हाला याची किंमत चुकवावी लागेल. या देशाची जनता कधीच कुणाला माफ करत नाही हे आपण इंदिरा गांधी यांच्या काळातही पाहिलंय.”
गेल्या काही महिन्यांपासून केंद्रीय तपास यंत्रणा महाराष्ट्रातील काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी नेत्यांच्या मागे लागली आहे. काही नेत्यांना या यंत्रणांनी समन्स तर महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांना अटक केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार भाजप केंद्रीय तपस यंत्रणांचा वापर करून सरकार पडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप नेत्यांनी केला आहे. दरम्यान, अजूनही महाविकास आघाडीतील नेते राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या निशाणावर आहेत. यावर वारंवार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.