बुधवार दि.13 ते मंगळवार दि. 19 ऑक्टोबर 2021
मन स्वच्छ व आशावादी ठेवल्यास निश्चित प्रगती
मन शांत कसे ठेवावे व प्रगती कशी साधावी असा प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारला असता गुरुजींनी प्रत्येकाला टोमॅटो घेऊन येण्यास सांगितले. त्यानुसार प्रत्येकाने कमी जास्त प्रमाणात टोमॅटो आणले. गुरुजींनी ते आठ दिवस जवळ ठेवण्यास सांगितले.त्यानंतर ते टोमॅटो कुजू लागले ज्यांनी कमी आणले होते त्यांना त्याचा फारसा त्रास जाणवला नाही. पण ज्यांनी भरपूर आणले होते त्यांना मात्र त्याचा वास असह्य झाला, त्यावर गुरुजींनी मुलांना सांगितल की तुमच्या प्रश्नाचे हे उत्तर आहे. आपण मनात सतत जर नकारात्मक विचार, राग द्वेष मत्सर असूया आणि नकोते विचार किंवा गैरसमज अथवा कपट भावना साठवून ठेवल्यास त्याचे प्रमाण वाढत जाऊन ते शेवटी असह्य होते त्यातूनच मानसिक विकार, वादावादी, भांडण-तंटे, शत्रुत्व, अवघड समस्या, आर्थिक अडचणी, दैवी कोप. आणि मानसिक अस्वस्थता असे त्रास सुरू होतात. जसे कम्प्युटरमध्ये टेम्पररी फाइल्स वाढल्या की कम्प्युटर काम करीत नाही त्याप्रमाणे हे आहे. त्यासाठी प्रत्येकाने केव्हाही चांगला विचार करावा. मनुष्यप्राणी म्हटलं की संकटे, त्रास अडचणी ह्या असणारच, पण सतत तेच मनात धरून ठेवल्यास त्याचा विपरीत परिणाम होतो आणि होणारी कामेही होत नाहीत. त्यासाठी दिवसातून थोडा वेळ तरी मन शांत ठेवून बसावे पाच-दहा मिनिटे प्राणायाम करावा आपल्या आयुष्यात घडलेली एखादी चांगली घटना आठवावी तसेच हे पण दिवस जातील व यापुढे सर्व काही चांगलेच होईल असा विचार करावा. चांगल्या विचारात प्रचंड शक्ती असते. त्यामुळे सतत जर चांगला विचार करीत राहिल्यास आपोआपच देवी शक्तींचे सहाय्य मिळत जाते आणि न होणारी कामे देखील होऊ लागतात. प्रत्येकाच्या बऱयावाईट कर्माचा हिशोब परमेश्वर ठेवत असतो त्यामुळे कुणाला. काय फळ द्यायचं याचा. विचार त्याच्यावरच सोडून द्यावा. कुणी कितीही गुप्तपणे कोणतीही बरी वाईट कामे. केली तरी त्याचे फळ आज ना उद्या भोगावेच लागते. त्यासाठीच चांगले विचार वाढवा. त्यांन मनही शांत होईल आणि प्रगतीच्या वाटा देखील दिसू लागतील. हे सर्व काही एकदम होणार नाही पण ज्या वेळी तुमचे दोष पूर्णपणे नष्ट होतील त्यावेळी तुम्हाला निश्चितच त्याचे चांगले फळ मिळेल.
मेष
गुरू शनी दशमात असल्याने नोकरी-व्यवसायाच्या बाबतीत चांगले यश. परदेश प्रवास योग. वास्तू विषयक सर्व कामे होतील. महत्वाची व आत्यंतिक गरजेची कामे इतरांच्या सहकार्याने होऊ लागतील. भाग्यशाली व श्रीमंत योग. त्यामुळे सर्व बाबतीत अनपेक्षितरीत्या मोठे यश मिळेल. घर. जागा. वास्तु खरेदी करणार असाल तर अनुकूल काळ आहे. शुक्र केतु योगावर अचानक धनलाभ होण्याची शक्मयता.
वृषभ
अनेक मोठय़ा कामाचा शुभारंभ कराल. राशीतच शत्रू नक्षत्रात असलेला राहू कामाच्या ठिकाणी काहीतरी गडबड गोंधळ करील. ग्रहमान समिश्र आहे. प्लॅनिंग न करता केलेल्या कामामुळे होणाऱया चुका हानिकारक ठरतील. हर्षल मंगळाचा षडाष्टक योग विचित्र व अनपेक्षित घटना घडवील. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे मतभेद, आर्थिक गुंतवणूक, मशिनरी हाताळणे, वादावादी हे सर्व प्रकार संकटाला बोलावून घेणारे ठरतील. पण प्रसंगावधान आणि सावधगिरी बाळगल्यास कोणताही त्रास होत नाही व संकट आलेच तर त्याला धैर्याने सामोरे जाण्याचा आत्मविश्वास निर्माण होईल.
मिथुन
गुरूची शुभदृष्टी धनस्थानावर असल्याने आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. सतत पैसा येत राहील. सर्व इच्छा पूर्ण करू शकाल. गाडी, वाहन, घर, बंगला, प्रवास वगैरे बाबतीत अनुकूल योग. कमी कष्टात मोठे यश मिळविण्याच्या नादात इतर मार्गाकडे मन वळण्याची शक्मयता आहे. आठवा शनि म्हणजे छोटी साडेसातीच त्यामुळे काही कामे रेंगाळत पडतील तरीही तुम्ही बेसावध राहू नका. वादावादी राजकारण यापासून दूर राहा.
कर्क
गुरुची पूर्ण शुभदृष्टी चंद्रावर असल्याने काही स्वप्ने प्रत्यक्षात उतरतील. एकाच वेळी अनेक कामांची जबाबदारी घेतल्याने मानसिक ताण प्रचंड वाढलेला दिसेल. मनावर नियंत्रण ठेवू देणार नाही. महत्त्वाच्या पदावरील व्यक्ती घरी येतील व तुमच्या कामाचा व्याप वाढविण्याचा प्रयत्न करतील. जीवनात पुढे जाण्यास ती एक उत्तम संधी असेल. काहीजण तुम्ही नोकरी सोडावी यासाठी मालक वर्गाचे कान भरण्याचा प्रयत्नही करतील सावध राहणे आवश्यक.
सिंह
कामाचा कितीही अनुभव असला तरी पहिल्या पायरीपासून सुरुवात करावी. त्यामुळे पूर्वी झालेल्या चुका समजतील. प्रयत्न सोडू नका. या सप्ताहातील ग्रहमान तुम्हाला अनेक बाबतीत यश देणारे आहे. जे काही कराल त्यात मोठे यश मिळवाल पण आपली कार्यक्षमता किती आहे त्यापेक्षा जास्ती करायला जाऊ नका. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य मिळू शकेल. काही नातेवाईक तुमच्या स्वभावाचा गैरफायदा घेवून महत्त्वाची माहिती तुमच्याकडून काढण्याचा प्रयत्न करतील.
कन्या
खर्च आणि कमाई यांचे गणित साधण्याचा प्रयत्न करा. कारण पुढे अनेक खर्च उद्भवणार आहेत नियंत्रण न ठेवल्यास पुढे विचित्र परिस्थिती उद्भवू शकते. मुलाबाळांचा अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका. केतूचा प्रभाव सुरू आहे, त्यामुळे भावंडांशी मतभेद होऊ शकतात. कोणते काम सुरळीत पार पडेल याची खात्री नाही तसेच प्रयत्न करूनही प्रत्येक कामात वारंवार अडथळे येतात. त्यासाठी विचारपूर्वक कोणताही निर्णय घ्या.
तूळ
चतुर्थातील गुरु शनीच्या सहकार्याने जागा, घर, वाहन, वास्तू विषयक सर्व समस्या मिटतील. नोकरी व्यवसाय व इतर बाबतीत ग्रहमान अनुकूल आहे. किरकोळ अडचणी वगळता सर्व कार्यात यश मिळेल. नवीन कामाची सुरुवात करू शकाल. आर्थिक व्यवहार जोरात चालतील. कर्जफेड करू शकाल. बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात असाल तर नवीन कामे मिळतील.
वृश्चिक
शेजारी व नातेवाईकांच्या बाबतीत महत्वाच्या घटना. कौटुंबिक सुख वाढेल आर्थिक विवंचना कमी होतील नोकरी संदर्भात काही समस्या असतील तर त्या कमी होऊ लागतील योग. वरि÷ांची उत्तम सहकार्य मिळेल. काही चुकीच्या व्यक्तींच्यामुळे नुकसान होण्याची शक्मयता. काही गुंतागुंतीची प्रकरणे निर्माण होतील. आप्तस्वकीय व मित्रमंडळी यांच्याशी संबंध सुधारतील महत्त्वाच्या कागदोपत्रीकामासाठी प्रवास तसेच वैवाहिक बाबतीत काही महत्वाच्या घटना.
धनु
आर्थिक आवक वाढेल. नोकरी व्यवसायातील सर्वत्रास कमी होतील. कारखानदारीची आवड असेल तर त्यात सुधारणा करू शकाल. मुलांच्या शिक्षणात प्रगती दिसू लागेल. काही बाबतीत वैवाहिक जोडीदार योग्य सल्ला देत असेल तर त्याचा फायदा करून घ्या. महत्त्वाचे अनेक ग्रह बलवान आहेत. त्यामुळे कुठेही विशेष अडचण जाणवणार नाही.
मकर
चंद्र-गुरूचा गजकेसरी राज योग सर्व कामात यश. समृद्धी आणि मानसन्मान देईल. आर्थिक सुबत्ता शिक्षणात यश कर्तबगारीला वाव मिळणे, हाती घेतलेली कामे पूर्ण होणे, ऐन संकटाच्या वेळी कोणाची तरी देवासारखी मदत मिळणे, असे सुंदर अनुभव येतील. काही शुभ घटना या आठवडय़ात घडू शकतात. अनेक व्यवसाय करण्याची संधीही मिळण्याची शक्मयता आहे. संधी वारंवार येत नसते जास्त योग्य वेळी योग्य संधीचा वापर केल्यास जीवनाचे सोने करू शकाल.
कुंभ
इतरांपेक्षा वेगळे असे काहीतरी करू शकता याची जाणीव होईल योग्य वेळी योग्य निर्णय योग्य विचार आणि उत्तम कार्यक्षमता यांच्या जोरावरच तुमची प्रगती होईल. वेळा आपल्या कामासाठी नको त्या व्यक्तीचे पायही धरावे लागतात पण त्यात कोणताही कमीपणा मानू नका. हा आठवडा चांगल यश देणारा आहे पण तुमचे नियोजन मात्र योग्य हवे. मालक वर्गाच्या काही सूचना तुम्हाला पाळावेच लागतील.
मीन
मंगल बुधाचे उत्तम सहकार्य मिळेल. काही कागदोपत्री व्यवहार सरकारदरबारी अडकले असतील तर ते पूर्ण होऊ लागतील. कार्यक्षमता वाढवा तुमच्या कल्पना अथवा कामाची पद्धत इतरांना कळेल, असे वागू नका. शुक्र मंगळ व शनी बुध योग काही योजनेद्वारा अचानक धनलाभ घडविण्याची शक्मयता आहे. दिवाळीच्या तोंडावर चैनीच्या वस्तू खरेदीसाठी बराच पैसा खर्च कराल. एखाद कार्य मनासारखे झाले नाही म्हणून ते अर्धवट टाकू नका.





