नारळ आपणच केलेल्या कामाचे फोडायचे,आमदार शिवेंद्रराजेंचा खासदार उदयनराजेंना टोला
प्रतिनिधी/ सातारा
नक्की तुमची खासदारकी हिशोबात धरायची का नाही. तुमचे महसूल मंत्रीपद हिशोबात धरायचे की नाही. नेमक्या कोणत्या योजनेच्या बैठकीला उपस्थित होता. कोणत्या मंत्र्याकडे पाठपुरावा केला. याचे काही इतिवृत्त असेल, फोटो असतील तर जाहीर करा उगाच नुसत्या हवेत गोळय़ा झाडू नका. विनाकारण आरोप करु नका, अशा शब्दात खासदार उदयनराजेंचे नाव न घेता आमदार शिवेंद्रराजेंनी उखळी तोफ डागली. दरम्यान, शाहुपूरीकरांसाठी कण्हेर पाणी पुरवठा योजनाही कै. भाऊसाहेब महाराजांच्यामुळे झाली असून नवीन वर्षाचे गिफ्ट आहे, असेही उद्गार त्यांनी काढले.
कण्हेर योजनेचा लोकार्पण सोहळा आमदार शिवेंद्रराजेंच्या हस्ते पार पडला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगरसेवक अविनाश कदम, भारत भोसले, नवनाथ जाधव, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्रकुमार मोहिते, नवनाथ जाधव, सुहास वहाळकर, शोभाताई केंडे, निलमताई देशमुख, माधवीताई शेटे, माजी उपसरपंच विकास देशमुख, विजय गार्डे, तुषार जोशी, नितीन तरडे, राजेंद्र केंडे, नरेश जांभळे, महेश जांभळे, चंदू देवरे, पिंटू गायकवाड, रामदास धुमाळ, आप्पा गोसावी, संकेत परामणे, पप्पू बालगुडे व सहकारी, पिंटू कडव, रमेश इंदलकर, मनोज कडव, दीपक अवकीरे व सहकारी, कमलेश जाधव, गणेश वाघमारे, सुरेश शेटे, अनिल पोळ, तात्या चोरगे, सुभाष गुरसाळकर, सुरेश पांढरपट्टे, नेताजी कुंभारे, प्रा. एम. जे. फडतरे, प्रा. आर. एस. जगताप, राम रेवाळे, उपकार्यकारी अभियंता माने, अभियंता अग्रवाल, मेंटेनन्स प्रमुख आवळे, योजनेचे ठेकेदार दीपक भिवरे, तसेच परिसरातील महिला व जेष्ठ नागरिकांची उपस्थिती उल्लेखनीय होती.
यावेळी आमदार शिवेंद्रराजे म्हणाले, लोकप्रतिनिधी म्हणून खऱया अर्थाने योजना आणल्याबद्दल मला समाधान आहे. अनेक अडचणीतून ही योजना आपण पूर्ण करु शकलो. ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार होते. त्यावेळी पाणी पुरवठा मंत्री दिलीप सोपल असताना या योजनेची मान्यता अधिवेशन काळात आणली होती. योजना मंजूरीला उशीरा झाला त्याचा फायदा झाला. 30 लाखाची लोकवर्गणीचा जो बोजा शाहुपूरीकरांवर पडला असता तो पडला नाही. यापूर्वीही कैलासवासी भाऊसाहेब महाराजांच्या नेतृत्वामुळे या योजनेचे पाणी मिळते आहे. त्या काळी त्यांनी तरतूद करुन ठेवली होती. म्हणून आज आपल्या सातारकरांना कण्हेरच पाणी मिळते आहे. शाहुपूरीवासियांनी हे लक्षात घेतले पाहिजे. काही लोकं हवेत गोळय़ा झाडत असतात. काहीही आरोप करत आहेत. 20 वर्षे काय केले आहे. पाणी कुठे होत?, जे आता पाणी आले आहे ते भाऊसाहेब महाराजांच्यामुळे आले आहे. त्यांनी कण्हेर योजनेची तरतूद केली ही वस्तूस्थिती आहे हे कोणी नाकारु शकत नाही. आज शाहुपूरीवासियांसाठी महत्वाचा दिवस आहे. नवीन वर्षात शाहुपूरीकरासाठी गिफ्ट आहे, असे त्यांनी सांगितले.
आमदार शिवेंद्रराजे पुढे म्हणाले, डांबरीकरण मीच केले. अहो ते आमदार फंडातून मंजूर आहे ते ही मीच केले. फक्त नारळ फोडायचा. त्यांनी एकाही योजनेच्या बैठकीचे इतिवृत्त दाखवावे, बैठकीचा फोटो दाखवावा. कुठल्या बैठकीला होते. कुठल्या मंत्र्यांना जावून भेटले. कासच्या बाबतीत त्यांचे काहीही नाही. आले की पदाधिकाऱयांवर दादागिरी करायची आणि नारळ फोडून मीच सगळे केले असे सांगत सुटायचे. नगरपालिकेची हद्दवाढ होवून दोन वर्ष झाली. या दोन वर्षात शाहुपूरीकडे नगरपालिकेने किती लक्ष दिले. आताच्या तीन महिन्यात मात्र कुठे ठेवू अन् काय करु असे झाले आहे. दोन तीन महिन्यात निवडणूका आहेत. म्हणून ही उठाठेव सुरु आहे. दोन वर्षात सत्तारुढ आघाडी इकडे बघायला आली नाही. नवीन काहीतरी भाग आल्यासारखा पाकव्याप्त कश्मिरमधून कश्मिरमध्ये आल्यानंतर आधार दिला पाहिजे. अशी गम्मत झाली आहे, अशी टीप्पणी केली. पुढे त्यांनी पाच वर्ष पालिकेची लुट आपण बघितलेली आहे. नागरिकांचा कराचा पैसा, शासनाकडून अनुदानाचा पैसा आला. कामे मात्र शुन्य. नुसती बिले काढायची. बिले काढून कमिशन घ्यायची. घंटागाडीवाल्याकडून कमिशन घ्यायचे. घंटागाडीवाल्यांनी वर्षात दोनदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कचऱयातून पैसे काढायचे उद्योग सुरु आहेत. मी माझे बोलत नाही. ही वस्तुस्थिती आहे. मला काय नवीन शोध लागला नाही. ही तुमची खासदारकी हिशोबात धरायची की नाही. तुमचे महसूलमंत्रीपद हिशोबात धरायचे की नाही. का डायरेक्ट ब्रेक देवून मागचेच बोलायचे. त्यावेळी हा मतदार संघ जावलीत होता. हद्दवाढ व्हायच्या अगोदर यापूर्वीच आमदार फंडातून डिपीडिसीतून कामे आणून अनेक कामे आणली. भैरोबा रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण केले. भैरोबाच्या पायऱयांचे काम, रिंगरोड प्रस्ताव नियोजनात आहे. मार्गी लावू. छोटीमोठी कामे होत राहतील. लोकांच्या विश्वासात पात्र राहून पूर्ण करुयात. आपल्या कामाचच उद्घाटन करायचे. आपल्या कामाचाच नारळ फोडायचा.ही काम करण्याची पद्धत कायम टेवूयात. शाहुपूरीच्या सर्वांगिण विकासासाटी झटत राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
उदयनराजेंच्यावर टीप्पणी
या योजनेमुळे समाधीच्या माळाचा प्रश्नही मार्गी लागणार आहे, असे सांगत ते पुढे म्हणाले, ही योजना सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी अडकली होती. ती मंजूर करुन घेतली. कास धरणासाठी आणि कण्हेर धरणाची 12 कोटीचा वाढीव निधी अजितदादांच्या माध्यमातून मंजूर करुन घेतला. आता महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर कासची सुधारित मंजूरी घेण्यात आली. कासचे काम अंतिम टप्यात आलेले आहे. काही लोकांना नुसतेच काहीही झाले तरी माझ्यामुळेच होतेय. जिल्हा बँकेच्या निवडणूकीच्यावेळी मी बोललो होतो. नशीब अजून कोणी डायलॉग मारलेला नाही. ऑक्सीजन पण सातारकरांना माझ्यामुळेच मिळतो. एवढेच आता सातारकरांच्यावर उपकार राहिलेले आहेत. सगळे जे घडतेट आहे ते माझ्यामुळेच, असे त्यांना वाटत आहे.









