प्रतिनिधी / लांजा
तुतारी एक्स्प्रेस रेल्वेची धडक बसून एका २२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना कोकण रेल्वेमार्गावर लांजा तालुक्यातील वाघणगाव येथे घडली. महेश प्रकाश घडशी असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश प्रकाश घडशी (वय- २२ वर्षे, रा. पडवण, घडशीवाडी) याला दारूचे व्यसन होते. तो नेहमी गावात दारू पिऊन भांडण करत असे. सोमवार दिनांक १६ नोव्हेंबर रोजी तो नेहमीप्रमाणे दारू पिऊन आला होता. दारूच्या नशेत तो संध्याकाळी ७ वाजता घरातून बाहेर पडला होता. त्यानंतर मंगळवार दिनांक १७ नोव्हेंबर रोजी त्याचा मृतदेह वाघणगाव येथील रेल्वे ट्रॅकवर आढळून आला. घरातील माणसांनी त्याचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळून आला. सावंतवाडी ते मुंबई जाणाऱ्या तुतारी एक्सप्रेसची त्याला धडक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
याबाबतची फिर्याद महेश घडशी याचे वडील प्रकाश नथुराम घडशी( ४७ वर्षे) यांनी लांजा पोलीस स्थानकात दिली आहे. याबाबत पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. अधिक तपास हेड.कॉन्स्टे. शांताराम पंदेरे हे करीत आहेत.