झी मराठीवरील तुझ्यात जीव रंगला या लोकप्रिय मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील व्यक्तिरेखांवर संबंध महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात. या मालिकेवर यातील पात्रांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. रांगडा राणादा आणि लाघवी पाठक बाई प्रत्येकाच्या कुटुंबाचा भागच बनले. या मालिकेच्या कथानकाने नुकतीच 5 वर्षांची लीप घेतली. या मालिकेच्या वेळेत देखील बदल झाले. नुकतेच या मालिकेने एक हजार भागांचा यशस्वी टप्पा पार पडला.
या मालिकेचे आणि त्यातील कलाकारांचे लाखो चाहते आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी यांनी या कलाकारांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. सुलोचनादीदी ही मालिका नियमितपणे बघतात आणि त्यातील कलाकारांना भेटण्याची त्यांची तीव्र इच्छा होती म्हणून नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी या कलाकारांनी सुलोचनादीदींची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. राणादा, पाठक बाई, लाडू या सगळय़ांना भेटून सुलोचनादीदींना आनंद झाला आणि या भेटीने हे कलाकार देखील भारावून गेले. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेचं चित्रीकरण कोल्हापूरमध्ये होतं आणि सुलोचनादीदी या स्वत: देखील कोल्हापूरच्या आहेत. त्यामुळे कलाकारांशी गप्पा मारताना कोल्हापूरचे अनेक किस्से आणि जुन्या आठवणी ताज्या झाल्या.









