प्रतिनिधी / सातारा :
सातारा पालिकेच्या सभेमध्ये घेण्यात आलेल्या विषयांच्या ठरावाची फाईल एका नगरसेवकाने घरी नेल्याची कुजबुज गेल्या पाच दिवसांपासून सुरु होती. त्याचे वृत्त ‘तरुण भारत’ने प्रसिद्ध करताच सकाळी 11.30 वाजता सातारा पालिकेत त्या नगरसेवकाने स्वतः फाईल आणून दिली. दरम्यान, ज्या कर्मचाऱ्याने फाईल दिल्या, त्या कर्मचाऱ्यास सभासचिव भोसले यांनी चांगलेच फैलावर घेतले. तरुण भारतच्या वृत्तानंतर फाईल आपोआप पालिकेत पोहोचल्याबाबतची चर्चा पालिकेत रंगली होती.
सातारा पालिकेच्या निवडणूकीला काही महिने उरले आहेत. सत्ताधाऱ्यांना सातारकर जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागू नये, म्हणून काळजी घ्यावी लागणार आहे. विरोधकांनाही सांभाळून घ्यावे लागणार आहे. यामध्ये मोठा कस लागणार आहे. असे असताना गेल्या पाच दिवसांपूर्वी सातारा पालिकेतून सर्वसाधारण सभेमध्ये घेण्यात आलेल्या विषयाची फाईलच चक्क एका नगरसेवकाने घरी नेवून ठेवली. त्या फाईलबाबत गेल्या चार दिवसांपासून जोरदार चर्चा सरु होती. सभा सचिव भोसले यांना तर फाईल नेल्यामुळे झोप उडाली होती. फाईल परत आणून द्या म्हणून त्या नगरसेवकास दररोज फोन करुन विनंती करत होत्या. परंतु त्यांना तसा प्रतिसाद मिळत नव्हता. तर विरोधी नगरसेवक फाईल परत कधी येणार अशी विचारणा करत होत्या. त्यामुळे यामध्ये सभा सचिव भोसले यांची मधल्यामध्येच कोंडी झाल्याची जोरदार चर्चा सुरु होती. तरुण भारतने वृत्त प्रसिद्ध करताच गुरुवारी सातारा पालिका वर्तूळात खळबळ उडाली. चेहऱ्यावरील ‘सुहास्य’ हरवलेल्या त्या नगरसेवकाने सकाळी 11.30 वाजता फाईल आणून पोहोच केली. फाईल देणाऱ्या कर्मचाऱ्याची चांगलीच झाडाझडती सभासचिव भोसले यांनी घेतली.









