माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर यांचे शिवसेनेला प्रत्युत्तर
प्रतिनिधी / देवगड:
देवगड-जामसंडे नगरपंचायतीमधील कचरा विल्हेवाट व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाबाबत विरोधक अपुऱया माहितीच्या आधारे राजकारण करीत आहेत. न. पं. ने टेंबवली येथील खरेदी केलेली जागा ही डंपिंग ग्राऊंडसाठी नसून ती घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी आहे. घनकचरा व्यवस्थापन आणि डंपिंग ग्राऊंड यामध्ये फरक आहे. हा फरक विरोधकांनी समजून घेतला पाहिजे. केवळ आगामी निवडणुका डोळय़ासमोर ठेवून आरोप करू नयेत. आरोप करण्यापूर्वी परिपूर्ण माहिती घ्यावी, असे प्रत्युत्तर गटनेते व माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर यांनी शिवसेनेला दिले आहे.
न. पं. कडे 60 टन खत उपलब्ध
देवगड -जामसंडे नगरपंचायत कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा सौ. प्रणाली माने, उपनगराध्यक्ष उमेश कणेरकर, माजी नगराध्यक्षा सौ. प्रियांका साळसकर, नगरसेवक बापू जुवाटकर, सुभाष धुरी, नगरसेविका उज्वला अदम आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना चांदोसकर म्हणाले, आमदार नीतेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली चार वर्षे नगरपंचायती देवगड व जामसंडे शहरात विकासकामे केल्याने शहर प्रगतीपथावर आहे. आगामी निवडणुकीमध्ये विरोधकांकडे कोणतेही विषय नसल्याने जनतेची सहानुभूती मिळविण्यासाठी शिवसेनेचा हा प्रयत्न आहे. देवगड नगरपंचायत होऊन केवळ चार वर्षे झाली आहेत. असे असतानाही नगरपंचायतीचे काम हे नगरपालिकांच्या तोडीचे आहे. मालवण नगरपालिका 104 वर्षाची असून आणि तेथे शिवसेनेची सत्ता असूनही तेथील डंपिंग ग्राऊंडची पाहणी साळसकर यांनी करावी. चार वर्षात देवगड-जामसंडे नगरपंचायत नवीन असूनही घनकचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र जागा खरेदी केली. ही जागा देखील शासनाच्या निकषानुसार रेडीरेकनरच्या दरापेक्षा कमी दराने खरेदी केली आहे. नगरपंचायतीने टेंबवली येथे 35 गुंठे जागा खरेदी केली आहे. या जागेच्या तांत्रिक बाबी पूर्ण झाल्या आहेत. या जागेवर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी प्रोत्साहन अनुदान योजनेंतर्गत 97 लाख 25 हजार रुपये खर्च करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत नगरपंचायतीला दीड कोटीचा निधी प्राप्त झाला आहे. नगरपंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी प्रदूषण सेंटर बोर्डाची परवानगी आवश्यक आहे. नगरपंचायतीने जागा खरेदी केल्यानंतर गेल्या दोन वर्षात या जागेत प्रकल्प होण्यासाठी आवश्यक असणाऱया सर्व परवानग्या मिळविण्यासाठी प्रयत्न केले. येत्या सहा महिन्यामध्ये टेंबवली येथे हा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू होणार आहे. या घनकचरा व्यवस्थापनामध्ये ओला कचरा, सुका कचरा, प्लास्टिक, काच, लोखंड यांचे मशिनद्वारे विलगीकरण होऊन खतनिर्मिती होणार आहे. सध्या देवगड-जामसंडे नगरपंचायत येथील नेनेनगर येथे खतनिर्मितीचा छोटा प्रकल्प सुरू आहे. यामध्ये एकावेळी पाच टन खत निर्माण होते. आतापर्यंत निर्मिती होऊन सुमारे 60 टन खत नगरपंचायतीकडे उपलब्ध आहे. हे खत आंबा बागायतदार व शेतकरी घेऊन जात आहेत.
नगरपंचायतीमध्ये येऊन प्रकल्पाची माािती घ्या!
टेंबवली येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी असलेल्या जागेसाठी 12 फूट उंचीचे कंपाऊंड करण्यात येणार आहे. तसेच गार्डनसह पाण्याची व्यवस्था करून टेंबवली येथील जनतेला कुठलाही त्रास होणार नाही असा प्रकल्प होणार आहे. या प्रकल्पाबाबत आरोप करण्यापेक्षा नगरपंचायतमध्ये येऊन माहिती घेणे आवश्यक होते.
साळसकर यांना आरोप करण्याचा अधिकार नाही!
विलास साळसकर यांना नगरपंचायतीवर आरोप करण्याचा कोणताही अधिकार नाही. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जनतेने नाकारलेल्या व्यक्तीकडून आम्ही जास्त अपेक्षा करीत नाही. तसेच संतोष तारी हे शहरप्रमुख या पदावर असल्याचे नुकतेच समजले. त्यामुळे तारी हे नगरपंचायत क्षेत्रात राहत आहेत. त्यांना नगरपंचायतमधून माहिती घेण्याचा अधिकार आहे. त्यांनी नगरपंचायतीकडून परिपूर्ण माहिती घ्यावी आणि मगच आरोप करावेत, असेही चांदोसकर म्हणाले.









