‘मुक्त व्हायला स्त्रीला स्वतःच्या मनासारखे वागायचे स्वातंत्र्य मिळणे गरजेचे आहे. पुरुषांशी स्पर्धा करून नव्हे, तर तिच्या स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाला आणि क्षमतेला जपून’ या माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधींच्या शब्दांच्या मागचा मथितार्थ सर्वानीच समजून घेणे आवश्यक आहे. स्त्री ही कित्येक वर्षांपासून जगात तिचे स्वतंत्र अस्तित्व स्थापित करण्यासाठी लढत आहे. बऱयाच समाजात आजही महिलांच्या मनावर ही शिकवण बिंबवली जाते, की जीवशास्त्रानुसार तिची ठेवण वेगळी आहे म्हणून ती समाजात कमकुवत आहे. काही भागांमध्ये, मुलीला शाळेत जरा कमी गुण मिळाले, की तिचे शिक्षण थांबवून तिचे लग्न करून देतात. तिच्या मनाचा मान ठेवणे तर दूरच, तिच्याकडे माणूस म्हणून देखील बघितले जात नाही. स्त्रीची ठेवण ही पुरुषापेक्षा भिन्न आहे म्हणून तर ती अद्वितीय आहे.
व्यापारीकरणामुळे घर चालवणे, कुटुंबाची काळजी घेणे, रोज चवि÷ स्वयंपाक बनवणे, इत्यादी जीवनावश्यक कामांची किंमत कमी होऊन, एखाद्याच्या नोकरीमध्ये पद काय आहे यावरून माणसाची किंमत ठरू लागली आहे. या शर्यतीत जर एखादी स्त्री भाग घेऊ बघत असेल तर तिला ज्या अडथळय़ांना सामोरे जावे लागते त्या अडथळय़ांची भणकदेखील समाजाला नसते. तरीही एक स्वयंभू स्त्री, उत्तम शिक्षण घेते, नोकरी करते आणि घरदेखील तितक्मयाच आपुलकीने सांभाळते. जग प्रत्येक क्षेत्रात आज इतकी निरंतर प्रगती करत असेल, तर ‘आदर्श गृहिणी’ या अवास्तव संकल्पांमध्ये क्रांती का घडत नाही? स्त्रीच्या जीवनाचे ध्येय हे पुरुषाची बरोबरी करणे नाही, तर तिचे आयुष्य मनमोकळेपणाने जगणे आहे. अशाच अवास्तव महिलांच्या प्रतिमा खोदून खंबीर, अपूर्ण तरीही स्वयंभू महिलाभिमुख चित्रपट भारतीय सिनेसृष्टीने प्रदर्शित केले आहेत.
1. इंग्लिश विंग्लिश-
तुम्हाला कसे वाटेल जर महिनाभर एकही सुट्टी न घेता तुम्ही अचूक काम केलेत आणि त्याची साधी नोंदही कोणी घेत नसेल तर? बऱयाच वेळेला, घरातील दिवस रात्र काम करणाऱया, घराला जपताना स्वतःला विसरणाऱया गृहिणीलादेखील तेच वाटत असते. सामान्य घरातील एक गृहिणी पैसे कमवत नाही, एका ऑफिसमध्ये जाऊन काम करत नाही म्हणून तिची किंमत कमी का होते? दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीने शशी नावाच्या अशाच एका हरहुन्नरी गृहिणीची भूमिका अगदी सुंदरपणे निभावली आहे. गौरी शिंदे दिग्दर्शित हा सिनेमा बऱयाच सामाजिक अक्षमतांबद्दल प्रेक्षकांना विचार करायला लावतो. एखादी भाषा बोलायला न येणे ही क्षुल्लक गोष्ट माणसाची बुद्धिमत्ता ठरवते का? माणसाच्या व्यवसायापलीकडे पाहून त्याला माणूस म्हणून आदर द्यायला नको का? असे कित्येक मुद्दे हा सिनेमा अगदी सहजपणे मांडतो आणि त्यावर तोडगादेखील सांगतो. स्त्रीला पुरुषाच्या यशावरून न तोलता, ती नक्की कोण आहे, हे जाणून घेऊन, स्वीकारून, तिला तिच्या हक्काचा मान दिला पाहिजे ही शिकवण इंग्लिश विंग्लिश हा सिनेमा आपल्याला देऊन जातो.
2. पिंक
‘नाही म्हणजे नाही’ हे प्रभावी वाक्मय आपल्याला एखाद्या माणसाच्या संमतीचा मान ठेवायला शिकवते. हा सिनेमा पुरुषवादी जगाची राक्षसी बाजू प्रेक्षकांसमोर मांडतो. एखादी स्त्री कोणते कपडे घालते, तिचे राहणीमान कसे आहे, यावरून तिच्या आयुष्याची किंमत कमी होत नाही. मुलगी रात्री बाहेर का फिरत होती यापेक्षा ते पापी पुरुष तिच्याकडे वाईट नजरेने का बघत होते हा प्रश्न विचारायला हवा. हा बदल तेव्हाच होईल जेव्हा स्त्रीकडे एक स्वतंत्र आयुष्य म्हणून बघितले जाईल. एका स्त्रीने कोणते कपडे घातलेत यावरून तिचे चारित्र्य पारखणे हे नुसते चूक नसून, तो एक गुन्हाही आहे. कारण अशाच किळसवाण्या विचारांमुळे, मुलींना असे वाटू लागते की त्यांचे अस्तित्व हे फक्त त्यांच्या शरीरापर्यंत सीमित आहे. तापसी पन्नू, अमिताभ बच्चन या दोघांची जोडी या सिनेमामध्ये खूप प्रभावी वाटते आणि त्यांचा न्यायासाठीचा लढा बघून योग्य वर्तन करायला प्रोत्साहन मिळते.
3. कहानी-
एक स्त्री, तिच्या परिवाराला जपायला, त्यांच्या विरुद्ध झालेल्या अन्यायाशी लढा द्यायला काय काय करू शकते, याचे उदाहरण म्हणजे कहानी हा सिनेमा आहे. एक स्त्री, गर्भवती, एकटीच तिच्या पतीला शोधायला, त्याला न्याय मिळवून द्यायला एका अनोळखी शहरात सगळय़ांशी लढते. या जिद्दीमागचे कारण एकच, आपल्या कुटुंबावर, नवऱयावर, अपार प्रेम. ही रहस्यमय गोष्ट आहे त्यामुळे ती स्वतः पाहून अनुभवायला हवी. एक स्त्री, जरी पुरुष नसली, तरी तिच्या स्वतःच्या क्षमतेनुसार तेवढीच क्रांती घडवून आणू शकते हे विद्या बालनच्या नैसर्गिक अभिनयातून आपल्याला दिसते.
4. अस्तित्व-
2000 साली प्रदर्शित झालेला हा सिनेमा, त्या काळासाठी खूपच प्रगत होता. स्त्रीला काही वर्षांपूर्वीपर्यंत आपल्या इच्छा, मत आणि स्वप्न व्यक्त करायचे स्वातंत्र्य नव्हते. एखाद्या स्त्रीच्या आपल्या पतीकडून काय अपेक्षा असतात हे जाणून घेण्याचा प्रयत्नदेखील केला जायचा नाही आणि जर तिने त्या व्यक्त केल्या, तर त्या इच्छेकडे दुर्लक्ष होऊन त्याचे अस्तित्व हरवून जायचे. नवऱयाची कितीही प्रेम प्रकरणे असली तरी ती मान्य आहेत, केवळ त्याच्या जैविक रचना आणि समाजातील वर्चस्वामुळे. पण स्त्रीने आपल्या इच्छा विसरून पुरुषाचे सगळे पाप पोटात घातले पाहिजे. व्यभिचाराचे गांभीर्य हे लिंगाशी जोडले नसून त्यामुळे दुखावल्या जाणाऱया भावनांवर आहे. पुन्हा एकदा ‘आदर्श गृहिणी’ ची कल्पना खोदून काढणारा हा सिनेमा स्त्रीच्या मनात चालणारा गोंधळ आपल्याला दर्शवतो.
मेरी कॉम, मोथेर इंडिया, नीरजा, चमेली, भूमिका असे अजून कितीतरी चित्रपट आहेत जे ‘परिपूर्ण स्त्री’ ची प्रतिमा खोदून अपूर्ण, सदोष, आणि स्वतंत्र स्त्रीचे वास्तव प्रेक्षकांसमोर मांडतात. यामधील कित्येक चित्रपट सत्यघटनांवर आधारित आहेत.
या सर्व गोष्टी, आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक स्त्रीमध्ये आहेत. पण तरीही समाजाने तिच्या समोर एक काल्पनिक प्रतिमा आणून ठेवली आहे आणि स्त्रीला त्या प्रतिमेनुसार स्वतःला बदलायला भाग पाडले आहे. या काल्पनिक प्रतिमेपलीकडे जाऊन, प्रथम स्त्रीला तिचे आयुष्य तिच्या इच्छेनुसार अनुभवण्याची संधी दिली तर जगात गुन्हा, राक्षसी वृत्ती आणि हिंसा कमी होऊन, अपार क्रांती घडेल. कारण स्त्रीचा जन्म हा इतर कोणासाठी नाही तर तिचे अस्तित्व साजरा करायला झाला आहे.
श्राव्या माधव कुलकर्णी









