कोरोनाच्या प्रकोपादरम्यान पोलीस कर्मचारी किती समर्पणासह स्वतःचे कर्तव्य बजावत आहेत, याचे उत्तम उदाहरण छत्तीसगडच्या डीएसपी शिल्पा साहू यांनी सादर केले आहे. शिल्पा साहू नक्षलवादाने प्रभावित बस्तर जिल्हय़ातील दंतेवाडामध्ये तैनात ओहत. गरोदरपणाच्या काळातही त्यांना तीव्र उन्हात रस्त्यांवर लॉकडाउनचे पालन करविण्यासह लोकांना कोविड सुरक्षा नियमांचे महत्त्व समजावताना पाहिले जाऊ शकते. रस्त्यांवर ये-जा करणाऱया वाहनांवरील लोकांची चौकशी करतानाची शिल्पा यांच्या पथकाची एक चित्रफित सोशल मीडियावर प्रसारित झाली आहे.
शिल्पा यांची ही छायाचित्रे त्यांचा निर्धार दर्शवितात तसेच पोलीस कर्मचाऱयांचे समर्पण अन्य कोरोनायोद्धय़ांपेक्षा कमी नसल्याचेही सांगतात. जनतेच्या सुरक्षेसाठी पोलीस रस्त्यांवर असताना स्वतः सुरक्षित राहण्यासाठी घरात थांबा असे आवाहन शिल्पा साहू यांनी लोकांना केले आहे.









