प्रतिनिधी/ बेळगाव
तीळगूळ घ्या गोड बोला अशा गोड आर्जवाचा आणि आपल्यातील स्नेह वाढविण्याचा संक्रांतीचा सण बुधवारी सर्वत्र साजरा होत आहे. या सणाच्या निमित्ताने शहर आणि परिसरात तीळगूळाच्या विक्रीला बहर आला होता. मंगळवार हा बाजारपेठेच्या सुटीचा दिवस असूनही संक्रांतीच्या निमित्ताने बाजारपेठेत उत्साहाचे वातवरण होते.
शहराच्या मध्यवर्ती भागात अनेक ठिकाणी तीळगूळाची विक्री जोमाने सुरू होती. प्रामुख्याने किर्लोस्कर रोड, गणपत गल्ली, नरगुंदकर भावे चौक, मार्केट या भागात नागरिकांचा संचार सुरू होता. अनेक लहान-मोठय़ा दुकानांमध्ये तीळगूळ विक्रीला बहर आला होता. त्याचबरोबर फिरत्या विक्रेत्यांनी देखील तीळगूळ हलवा विक्रीची पर्वणी साधली होती. शहराबरोबरच उपनगरी भागातील अनगोळ शहापूर आणि टिळकवाडीमध्येही ठिकठिकाणी तीळगूळ खरेदीसाठी ग्राहकवर्ग संचार करीत होता.
तीळगुळामधील विविध नमून्यांची मांडणी ग्राहकवर्गाचे चित्त वेधून घेणारी होती. तीळगुळाच्या बरोबरीने अनेक आकारांमधील रंगीबेरंगी डबे हे देखील या खरेदी आकर्षणाचे केंद्र होते. बालचमूंसह महिला वर्गाचा ओढा याकडे अधिक प्रमाणात होता. या वस्तूंची खरेदी करण्यासाठी ग्राहक वर्गाने बाजारपेठेत गर्दी केली होती. संक्रांतीच्या उत्साहाचा बहर शहरभर दिसून आला









