मुंबई \ ऑनलाईन टीम
वर्धा जिल्ह्याचे शिवसेनेचे माजी आमदार अशोक शिंदे यांनी शिवबंधन सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. अशोक शिंदे यांनी मुंबईत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप, मोहन जोशी, रणजितसिंह देशमुख या नेत्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. अशोक शिंदे वर्धा हिंगणघाटचे माजी आमदार असून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षाची जबाबदारी घेतल्यापासून आक्रमक पवित्रा घेतला आहे. आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा एल्गार केल्यापासूनच पटोलेंच्या नेतृत्वात अनेक नेत्यांचे पक्षप्रवेश होऊ लागले आहेत. नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत अशोक शिंदे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. अशोक शिंदेंच्या प्रवेशामुळे काँग्रेसला हिंगणघाटमध्ये बळ मिळेल. नाना पटोले यांनी अशोक शिंदे यांचे पक्षात स्वागत करुन अभिनंदन केलं आहे.
हिंगणघाट विधानसभा माजी आमदार अशोक शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे उपनेतेपद होते. अशोक शिंदेंनी १९९५ मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणी आमदार म्हणून निवडून आले यानंतर ते ३ वेळा आमदार झाले. शिवसेनेत असताना राज्यमंत्री पदाची जबाबदारी सुद्धा अशोक शिंदे यांना देण्यात आली होती. शिंदे यांना स्थानिक पातळीवर डावलल्यामुळे शिवसेनेवरोधात नाराजी पसरली होती. या नाराजीमुळे त्यांनी शिवसेनेशी फारकत घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. अशोक शिंदेंनी जुलैमध्येच शिवसेना सोडली आहे.








