2015 नंतर कौटुंबिक कलहामुळे मानसिक त्रास, कुटुंबियाच्या सोबतीमुळे अथक प्रयत्नानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी पुनरागमन
वृत्तसंस्था/ लखनौ
गेल्या काही वर्षात कौटुंबिक कलहाला कंटाळून एकदा नाही तर तीन वेळा आपल्या मनात आत्महत्येचा विचार आला होता, असा खळबळजनक खुलासा भारताचा जलद गोलंदाज मोहम्मद शमीने केला आहे. रोहित शर्मासोबत इन्स्टाग्रामवर बातचीत करताना त्याने आपल्या काही खासगी गोष्टी शेअर केल्या. पत्नी हसीन जहाँसोबतच्या अंतर्गत कलहामुळे बीसीसीआयने आपला करार रोखून धरला होता. याशिवाय, मॅच फिक्सिंगसारखे गंभीर आरोप केल्यामुळे तीन वेळा आत्महत्येचा विचार आला होता, पण कुटुंबियांच्या सोबतीमुळे आपण यातून बाहेर पडू शकलो, अशी कबुली शमीने दिली.
इंग्लंडमधील 2015 च्या विश्वचषक स्पर्धेवेळी दुखापतीमुळे आपल्याला मैदानावर उतरणे मुश्किल झाले होते आणि त्या दुखण्यातून सावरण्यासाठी आपल्याला 18 महिन्यांचा अवधी लागला. हा आपल्या कारकिर्दीतील सर्वात तणावाचा काळ होता याची आठवण त्याने सांगितली. विशेष म्हणजे, या दुखापतीतून सावरण्याचा काळ कठीण होता कारण दररोज तेच तेच व्यायाम करायचे होते. पण, कठोर मेहनतीच्या जोरावर मी यावर मात करु शकलो व आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी पुनरा करु शकलो याचा आनंद आहे असेही त्याने सांगितले.
पत्नी हसीन सोबतच्या कलहामुळे मानसिक त्रास
पत्नी हसीन जहाँसोबतच्या तणावग्रस्त संबंधांमुळे अतिशय तणावात गेलेल्या 2018 मधील काही ठळक घडामोडीवरही त्याने परिस्पर्श केला. हसीनने शमी आणि त्यांच्या कुटुंबियांवर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप केले. याशिवाय त्याचा मॅच फिसिंगमध्ये सहभाग असल्याचे आरोपही तिने केले होते. यामुळे बीसीसीआयने शमीचा वार्षिक करार रोखून धरला होता. मात्र या सर्व तणावपूर्वक परिस्थितीवर मात करत शमीने जोरदार पुनरागमन करत यशस्वी गोलंदाज म्हणून सिद्ध केले.
या कठीण काळाबद्दल बोलताना शमी म्हणाला की, 2018 मधील माझ्या कठीण काळात कुटुंबीय पाठिशी भक्कमपणे उभे राहिले नसते तर मला क्रिकेट सोडावे लागले असते. आम्ही 24 व्या मजल्यावर राहात होतो, यामुळे माझ्या कुटुंबाला मी तेथून उडी घेईल की काय अशी सारखी भीती वाटत असे. मात्र, माझा भाऊ खंबीरपणे पाठिशी उभा राहिला. अशा परिस्थितीत मी क्रिकेटव्यतिरिक्त कोणत्याही गोष्टीचा विचार करु नये, यासाठी घरच्या लोकांनी फार साथ दिली. यानंतर मी सराव सुरू केला आणि डेहराडून ऍकेडमीत मेहनत घेतली. यामुळेच आंतरराष्ट्रीय पातळीवर मी दुसऱयांदा दमदार इंनिग सुरु करु शकलो, असे अनुभवही त्याने यावेळी मांडले.









