मनपासह 11 पालिकांची निवडणूक : 17 पंचायती, 1 जि.पं.ची पोटनिवडणूक पालिका, पंचायतींमधील प्रत्येकी चार उमेदवार बिनविरोध
प्रतिनिधी / पणजी
राज्यातील 11 पालिका व एक महानगरपालिका यांच्या दि. 20 व 21 मार्च रोजी होणाऱया निवडणुकीत 2 लाख 82 हजार 511 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्याशिवाय 17 ग्रामपंचायतींच्या 18 प्रभागांसाठी व एक जिल्हा पंचायत व एक नगरपालिका यांच्या पोटनिवडणुकीत 27 हजार 564 मतदार मिळून एकूण 3 लाख 09 हजार 75 मतदार आपला मतदान हक्क बजावणार आहेत.
पणजी मनपाच्या 30 प्रभागांसाठी होणाऱया निवडणुकीत 32041 मतदार आहेत. त्यात 15121 पुरुष आणि 16920 महिलांचा समावेश आहे. मनपा परिसरातील एकूण 33 भागात स्थापन करण्यात येणाऱया 67 मतदान केंद्रांवरून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या माध्यमातून हे मतदार आपला मतदानहक्क बजावणार आहेत. ही निवडणूक दि. 20 रोजी होणार आहे.
पालिकांसाठी दोन टप्प्यांत होणार मतदान
फोंडा व सांखळी वगळता उर्वरित 11 पालिकांची निवडणूक दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात सहा पालिकांसाठी दि. 20 रोजी तर दुसऱया टप्प्यात पाच पालिकांसाठी दि. 21 रोजी निवडणूक होणार आहे. त्यांचे एकत्रित 168 प्रभाग असून 312 मतदान केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. या निवडणुकीत 1 लाख 23 हजार 319 पुरूष आणि 1 लाख 27 हजार 151 महिला मिळून एकूण 2 लाख 50 हजार 470 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
केपेतून 3 तर वाळपईतून 1 बिनविरोध
दरम्यान, केपे पालिकेतून 3 आणि वाळपई पालिकेतून 1 मिळून चौघे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. त्यामुळे संबंधित प्रभागात मतदार होणार नसल्याने तेवढी मतदारसंख्या कमी होणार आहे.
ग्रामपंचायतींच्या 18 प्रभागांमध्ये पोटनिवडणूक
राज्यातील 20 ग्रामपंचायतींच्या 22 प्रभागांसाठी पोटनिवडणूक होणार होती. मात्र त्यातील 4 उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. त्यात भिरोंडा, रिवण, चिखली या पंचायती आणि म्हाऊस पंचायतीच्या दोन पैकी एका प्रभागातील उमेदवाराचा समावेश आहे. त्यामुळे आता केवळ 17 ग्रामपंचायतीमध्येच पोटनिवडणूक होणार असून 10 हजार 514 मतदार मतदानहक्क बजावणार आहेत.
नावेली जिल्हा पंचायतीच्या पोटनिवडणूक
नावेली जिल्हा पंचायतीच्या पोटनिवडणुकीत 7313 पुरूष आणि 8253 महिला मिळून एकूण 15566 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीसाठी 23 मतदानकेंद्रें स्थापन करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर सांखळी पालिकेच्या क्र. 9 या ओबीसीसाठी राखीव प्रभागात होणाऱया पोटनिवडणुकीत एकूण 584 मतदार मतदान करणार आहेत.
निवडणूक पालिकेची, पंचाईत उमेदवारांची! प्रभाग फेररचनेतील घोळामुळे उमेदवारांचा गोंधळ
पणजी महानगरपालिकेसह राज्यातील 11 पालिकांच्या निवडणुकीला विविध प्रकारे लागलेले अडथळ्यांचे ग्रहण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचल्यानंतर अखेर निवडणूक प्रक्रिया मार्गी लागली. परंतु एका वेगळ्याच घोळामुळे सध्या उमेदवारांचा फार मोठा गोंधळ उडाला आहे. परिणामी ‘पालिकेची निवडणूक आणि उमेदवारांची पंचाईत’ असे चित्र निर्माण झाले आहे.
ऐन निवडणुकीच्या तोंडावरच प्रभाग फेररचना करण्यात आल्यामुळे हा घोळ आणि गोंधळ उडाला आहे. त्यातून आपला प्रभाग परिसर कोणता आणि मतदार कोण? याची सुद्धा माहिती नसल्यामुळे अनेक उमेदवार बुचकळ्यात पडले असून मतदारांच्या गाठीभेटी घ्यायच्या कशा? असा गहन प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.
फेररचनेच्या घोळामुळे प्रकरण न्यायालयात
फेररचनेच्या याच घोळामुळे गोंधळलेल्या काही इच्छुकांनी निवडणूक प्रक्रियेस हरकत घेतली होती. परंतु राज्य निवडणूक आयोग ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे नंतर प्रकरण न्यायालयात पोहोचले. त्यानुसार न्यायालयाने पाच पालिकांच्या निवडणूक प्रक्रियेस स्थिगिती दिली. ही स्थगिती सरकारला रूचली नाही. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले व तेथे अंतरिम स्थगिती मिळविण्यात सरकार यशस्वी ठरले. त्यामुळे निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. असे असले तरी ही निवडणूक आता दोन टप्प्यात म्हणजेच दि. 20 व 21 मार्च अशी दोन दिवस घेणे सरकारला भाग पडले आहे.
उमेदवारांना प्रारंभिकही माहितीही नाहा
पणजी मनपासह सहा पालिकांची निवडणूक दि. 20 रोजी तर उर्वरित पाच पालिकांची निवडणूक दि. 21 रोजी होणार आहे. त्यातून प्रारंभीची सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन उमेदवारांचे अंतिम चित्रही स्पष्ट झाले व सर्व उमेदवार जोमाने प्रचारकार्यात उतरले. परंतु त्यांची खरी कसोटी येथेच लागत आहे. आपण प्रचारासाठी फिरतो खरे, पण आपल्या प्रभागात कोणता परिसर समाविष्ट आहे, कोणती घरे आहेत व आपले मतदार कोण? याची प्रारंभिक माहितीसुद्धा अनेक उमेदवारांना नाही. या गोंधळातून प्रथमच निवडणूक लढविणाऱया नवख्या उमेदवारांसह प्रस्थापित, विद्यमान उमेदवारही सुटलेले नाहीत. महिला उमेदवारांच्या बाबतीत तर हा गोंधळ मर्यादेच्या पलिकडील आहे, असेही दिसून आले आहे.
अनेक मतदारही पडलेत बुचकळ्यात
बरे, हा प्रकार केवळ उमेदवारांपुरताच मर्यादित आहे अशीही परिस्थिती नाही. प्रभाग फेररचनेमुळे मतदारांचीहा फार मोठा गोंधळ उडालेला आहे. अनेकांना आपले घर कोणत्या प्रभागात आहे आणि उमेदवार कोण? याची माहितीसुद्धा नाही, असेही एका पाहणीत दिसून आले आहे. परंतु मतदारांना त्यासाठी चिंता करण्याचे कारण राहिलेले नाही. जो कोणी उमेदवार असेल तो प्रचारासाठी दारात येईल तेव्हा समजेल, अशा वृत्तीतून ते शांत आहेत.
घरे शोधण्यातच उमेदवारांचा वेळ खर्ची
पंचाईत झाली आहे ती उमेदवारांची. फेररचनेदरम्यान काही परिसरांची प्रभागांची अशी काही फोडाफोडी करण्यात आली आहे की, एक एका परिसराची दोन ते तीन प्रभागात सुद्धा विभागणी करण्यात आली आहे. त्यामुळे मतदारांना गाठून प्रचारकार्य करण्यापेक्षा घर क्रमांकानुसार त्यांची घरे शोधण्यातच उमेदवारांचा वेळ खर्ची होत आहे. अशा परिस्थितीत एखाद्या भलत्याच्याच घरात जाऊन मत देण्याचे आवाहन केल्यामुळे अपमानीत किंवा खजिल होण्याचेही प्रसंग उद्भवत आहेत.
प्रभागांच्या अशाप्रकारे फोडाफोडी करण्यामुळे दुरावलेल्या अंतराला कंटाळून अनेकांचे कार्यकर्तेही सोबत फिरणे टाळू लागले आहेत. त्यामुळे जेमतेम कार्यकर्त्यांना घेऊनच प्रचारकार्य करण्याची वेळ उमेदवारांवर आली आहे. काही ठिकाणी तर ‘एकला चलो रे’ असेही चित्र दिसून येत आहे.
दोन प्रभाग समान भाग!
पणजी मनपाच्या दोन प्रभागांचेच उदाहरण द्यायचे झाल्यास 17 आणि 27 चे देता येईल. या दोन्ही प्रभागात एक-दोन प्रभागांचे अंतर असते तर एकवेळ समजता आले असते. परंतु कुठे 17 आणि कुठे 27, तब्बल 10 प्रभागसंख्येचा फरक. तरीही दोन्हीमध्ये समान भागांचा समावेश आहे. फरक आहे तो केवळ पणजी विधानसभा मतदारसंघाच्या भागांचा.
दोन्ही प्रभागांमध्ये पणजी चर्च जवळ, 31 जानेवारी रोड कोर्तीन, बिशप पॅलेसजवळ, जोगर्स पार्कजवळ, निर्मला इन्स्टिटय़ूटजवळ, आकाशवाणीजवळ आल्तीनो पणजी (भाग) या समान भागांचा समावेश आहे. त्यातील प्रभाग 17 मधील सर्व भाग पणजी विधानसभा मतदारसंघाच्या भाग क्र. 12, 15 व 20 मधील आहेत. तर प्रभाग 27 मधील भाग 8, 10 व 12 या भागांचा समावेश आहे. अशी परिस्थिती असेल तर घरे शोधताना उमेदवारांचा आणि उमेदवार ओळखताना मतदारांचा गोंधळ उडणार नाही तर काय होईल?









